| कोर्लई | वार्ताहर |
मुंबईच्या इंडियन मार्शल ट्रेनिंग सेंटरतर्फे संस्थेचे अध्यक्ष अजय शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सोमवंशीय चौकशी समाज हॉलमध्ये नुकतेच पाच दिवशीय वार्षिक कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. इंडियन मार्शल आर्ट्स ट्रेनिंग सेंटर गेल्या 37 वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष अजय आर. शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या वार्षिक कराटे शिबीर आयोजित केले जात आहे.
या शिबिरामध्ये वर्षभर मुलांनी केलेल्या मेहनतीची परीक्षा घेऊन त्यांची गुणवत्ता केली जाते. या शिबिरात फक्त कराटे नव्हे, तर प्राचीन युद्धकला तसेच विविध शस्त्रकला पारंगत व्यक्तींकडून शिकवल्या जातात. मुंबई, उल्हासनगर, ठाणे अश्या विविध जिल्ह्यांमधून जवळजवळ 200-250 खेळाडू दरवर्षी सहभाग घेत असतात. हे पाच दिवसीय शिबीर दिनांक 28 डिसेंबर 2024 ते दिनांक 1 जानेवारी 2025 या कालावधीत संपन्न झाले.
या शिबिरात व्हाईट बेल्टपासून ब्लॅक बेल्ट व डिग्रीपर्यंत सर्वांची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी लागणार्या सर्व घटकांची तयारी अध्यक्ष अजय आर. शाह, उपाधक्ष शिवम गुप्ता व वरिष्ठ प्रशिक्षक लोचन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यावेळी सर्व यशस्वी कराटे शिबिरार्थींना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.