दोन मोबाईलसह रोकड जप्त
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील आंतोरा गावच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका जुगारावर पेण पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दि.23 मार्च रोजी सेलीब्रेशन रिसॉर्टवर कुंटणखाना प्रकरण समोर आले होते. त्यामधील आरोपी सेलिब्रेशन रिसॉर्टचे मालक गणेश गायकर यांचे ही नाव या मटका प्रकरणात पुढे आले आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्ती पुर्ण केलेल्या नाहीत, त्यामुळे पेणमध्ये एकच खळबख उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 12 जून रोजी रात्रीच्या सुमारास अंतोरा पाटणेश्वर गावातील पुलाजवळील सर्कल परिसरात एक संशयित व्यक्ती खलील इस्माईल पठाण (52) हा लोकांकडून पैसे घेऊन मोबाईलच्या माध्यमातून मटका जुगाराचे आकडे स्वीकारत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, जप्त मुद्देमालामध्ये ओप्पो कंपनीचा मोबाईल, रियलमी कंपनीचा मोबाईल तसेच भारतीय चलनातील रोख रक्कम यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासात जुगार व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल क्रमांकांमध्ये गणेश गायकर यांचा संदर्भ समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता अधिक खोलात जाण्याची शक्यता आहे.
पेण तालुक्यात मटका आणि अवैध जुगाराचे जाळे पुन्हा सक्रिय होत असतानाच पोलीसांनी समय सुचकता दाखवत या अवैध्य धंद्यावर कारवाई करून खाकीचा दरारा कायम असल्याचे दाखवून दिले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस निरिक्षक संदिप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुशांत भाईर हे करत आहेत.







