| नेरळ | प्रतिनिधी |
जास्त पाण्याची शेती नसलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही बियाणांची पेरणी करण्यासाठी निल ड्रम सिडर हे लहानसे मशीन मोठे मदतगार ठरत आहे. 2008 मध्ये शेतकऱ्यांचे कोणत्याही बियाणांचे पेरणी करण्याचे कमी कष्ट पडतील असे ड्रम सिडर निर्माण करण्याचे काम कर्जत तालुक्यातील निलिकेश लक्ष्मण दळवी यांनी केले आहे. मागील 15 वर्षात किमया दीड हजार निल ड्रम सिडर यांची विक्री झाली असून, कृषी विभागदेखील या लहानशा आणि आर्थिकदृष्ट्या स्वस्त असलेले ड्रम सिडर खरेदी करण्याची शिफारस करीत असते.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची शेती करताना बियाणाची पेरणी ही करावीच लागते. त्यानंतर तयार होणारे रोपांची लागवड करावी लागते. मात्र, त्या प्रत्येक कामासाठी मजूर किंवा शेतकऱ्यांच्या घरातील माणसे यांची मदत शेतकऱ्याला घ्यावी लागते. त्यामुळे बियाणांची पेरणी करणे आणि त्यानंतर त्या रोपांची लागवड करणे हे काम तसे प्रत्येक शेतकऱ्यांना खर्चिक असते. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीचा काही भाग हा तसाच ठेवून देत आणि आपल्याला झेपेल एवढेच कामे करण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांचा हा मजुरांची शोधाशोध करण्याचा आणि आर्थिक खर्च यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न प्रगतशील शेतकरी लक्ष्मण दळवी यांच्या मुलांनी केला. एकरी भाताचे विक्रमी उत्पन्न घेणारे दळवी यांनी आपल्या मुलांना शेतकऱ्यांची अडचण सोडविण्यासाठी काही यंत्र बनविता येईल का अशी चर्चा केली. त्यांनतर निलिकेश लक्ष्मण दळवी यांनी आपल्या कर्जत तालुक्यातील वदप गावी शेतकऱ्यांना मदतगार ठरेल असे यंत्र बनविले आणि निल ड्रम सिडरची निर्मिती झाली.
2008 मध्ये या ड्रम सिडर यंत्राची निर्मिती निलिकेश यांनी केले आणि दरवर्षी हे ड्रम सिडर वर्षाकाठी किमान शंभरच्या संख्येने शेतकरी विकत घेतात. दोन चाके असलेले एक शेतकरी स्वतः ओढू शकेल असे हे ड्रम सिडर असून, एका दिवसात या ड्रम सिडरचे माध्यमातून एक व्यक्ती किमान तीन एकर जमिनीमध्ये भाताची पेरणी करू शकतो. हे भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या धान्याची बियाणे यांची पेरणी केल्यानंतर पुन्हा त्या त्या पिकाची लागवड करण्याची गरज भासत नाही. केवळ त्या पिकाच्या दरम्यान उगवणारे गवत ते पीक सात ते आठ इंचाचे झाल्यावर काढण्याचे काम शेतकऱ्याला राहते आणि शेवटी ते पीक तयार झाल्यावर कापणी करण्याचे काम शिल्लक राहते. असे हे ड्रम सिडर त्याचे निर्मीत निलिकेश यांच्याकडून वर्षाकाठी शंभरहून अधिक विक्री होतात. ठाणे आणि पालघर तसेच रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किमान 1000 ड्रम सिडर दळवी यांच्याकडून विकत घेतले आहेत. या सर्व यंत्राची निर्मिती निलिकेश दळवी हे आपले बंधू नैनेश यांच्या मदतीने कर्जत तालुक्यातील वदप गावी करतात. या ड्रम सिडर यंत्र देशाच्या अनेक भागात पोहोचले असून, कृषी विभाग मोठ्या शेतकऱ्यांना हे यंत्र वापरण्याची शिफारस करीत असते.







