। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सौर ऊर्जेचे गाढे अभ्यासक आणि संशोधक निलेश मोने यांनी बहुपयोगी सोलर ड्रायर बनविला आहे. त्यांनी केलेल्या या संशोधनाबद्दल सोमवारी (दि.12) भारत सरकारतर्फे पेटंट बहाल करण्यात आले आहे. या मूलभूत संशोधनाबद्दल स्वातंत्र्य दिनानिमित्त जांभुळपाडा ग्रामस्थ व सुधागड तहसीलदार यांनी संशोधक निलेश मोने यांचा सत्कार केला आहे.
निलेश मोने हे सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील रहिवासी असून त्यांनी बनविलेला सोलर ड्रायर हा शेतकर्यांसाठी तसेच महिला बचत गट व लघुउद्योग यासाठी उपयुक्त आहे. हा सौर ड्रायर कमी खर्चात निर्माण होतो व वापरण्यास सुलभ आहे. यामध्ये कांद्यापासून सर्व भाज्या तसेच आलं आदी सर्व वाळवता येते. ज्यामुळे हा नाशिवंत माल अधिक काळ टिकतो. शेतकर्यांचा माल वाया जाऊ नये यासाठी गेली सात वर्ष निलेश मोने अथक परिश्रम घेत होते. निलेश यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे जांभूळपाडा येथील सरपंचांसह मोठ्या संख्येने उपस्थितीत ग्रामस्थांनी संशोधक निलेश मोने यांचा सत्कार केला. तसेच, सुधागड तहसील कार्यालयात सुद्धा निलेश मोने यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून सत्कार करण्यात आला.