साध्या गाडीऐवजी महामंडळाने पाठवली निमआराम; प्रवाशांना भूर्दंड

। पोलादपूर । वार्ताहर ।

गणेशोत्सव काळात अनेक प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी बस सेवेच्या मालक-चालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करून प्रवाशांची लुट केल्याचा आरोप अनेकांनी केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील गाडी बदलल्याचे कारण पुढे करून वाहकांमार्फत ऑनलाईन तिकिट काढलेल्या प्रवाशांसह सर्वच प्रवाशांकडून जादाचे भाडे वसूल केल्याची घटना चर्चेत आली.

2 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट-पुणे या स्थानकातून महाडकडे येण्यासाठी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट-विन्हेरे अशी ऑर्डीनरी एक्सप्रेस बस सोडण्यात येणार असल्याने अनेकांनी पुणे येथून महाडकडे येण्यासाठी ऑनलाईन तिकिटाचे बुकींग करून पेमेंट केले. यावेळी अचानक सामान्य गाडीऐवजी निमआराम बस एमएच 06 एस 8963 या मार्गावर सोडून प्रवाशांना स्वारगेट तसेच पुणे शहराच्या अन्य भागातून गाडीमध्ये प्रवेश देत प्रत्येक प्रवाशामागे 75 रूपयांपर्यंत तिकिटदरातील फरकाची रक्कम वसूल करण्यात आली.

काही गरीब प्रवाशांना त्यांचे नातेवाईक स्वारगेट स्थानकामध्ये सोडून माघारी पुणे शहरातील निवासस्थानी गेले असता वाहकाकडून तिकिटाच्या फरकाची रक्कम मागताना अरेरावीची भाषा वापरण्यात आली. यावेळी काही प्रवाशांनी महाड आगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारचे सौजन्य या प्रवाशांना दाखविण्यात आले नाही. अनेकांनी महाड कंट्रोल केबिनमध्ये फरकाच्या रक्कमेच्या वसूलीबाबत तक्रार केली असता साध्या बसऐवजी निमआराम बसमधून प्रवास झाला ना, आता कशाला फरकाच्या रक्कमेबाबत बोलताय, असे समजविण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक प्रवाशी निरूत्तर होऊन आपआपल्या घरी परतले.

Exit mobile version