पाच बकर्या जखमी
| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील खैराट येथे शेडमध्ये शिरलेल्या कुत्र्यांनी नऊ बकर्यांचा फडशा पाडला, तर पाच बकर्या गंभीर जखमी झाल्या आहेत. खैराट येथील शेतकरी लक्ष्मण भोईर यांनी बकर्या बांधून ठेवलेल्या शेडमध्ये शनिवार, दि.18 जून रोजी दुपारी दोनच्या दरम्यान तीन कुत्री शिरली. या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ बकर्या मृत्युमुखी पडल्या, तर पाच बकर्या गंभीर जखमी अवस्थेत आहेत. तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पसरली असून, या कुत्र्यांचे निर्बिजीकरण होत नसल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे या भटक्या कुत्र्यांबद्दल नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण पसरलेले असते. बकर्यांच्या कळपात जाऊन नऊ बकर्या फस्त करणारे भटके कुत्रे लहान मुलांवरदेखील हल्ला करण्याची शक्यता असल्याने पालकवर्गामध्येदेखील भीतीचे वातावरण पसरले असून, या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.