भरधाव कारने नऊ मजुरांना चिरडले; दोघांचा मृत्यू

। नागपूर । वृत्तसंस्था ।

नागपुरात एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना अक्षरक्ष: चिरडले आहे. या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी (दि. 16) मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. यात एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या नऊ मजुरांना चिरडले आहे. दोन मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचादेखील समावेश आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या सात जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी ही कार खूप वेगात होती. त्याचवेळी फूटपाथवर बरेच लोक झोपले होते. तसेच कारमध्ये असलेले सात जण हे 20 ते 22 वयोगटातील असून मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याच्या नादात गाडी मागे पुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, आरोपी कारचालक भूषण लांजेवार याला वाठोडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

Exit mobile version