| हरियाणा | वृत्तसंस्था |
हरियाणातील नूह येथे शुक्रवारी रात्री धार्मिक यात्रेवरुन आलेल्या पर्यटकांच्या बसला भीषण आग लागली आहे. या अपघातात आगीत होरपळून 9 भाविकांचा मृत्यू झाला असून चोवीसहून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत.
हरियाणातील नूंह येथे कुंडली मानेसर-पलवल एक्सप्रेस वेवर रात्री दीडच्या सुमारास मथुरा दर्शन करून परतणाऱ्या बसला आग लागली. या बसमध्ये 64 लोकांचा समावेश होता. आगीचे लोळ पाहून आजूबाजूच्या ग्रामस्थांनी एक्स्प्रेस वेकडे धाव घेतली. स्थानिकांनी बसवर पाणी टाकण्यास सुरुवात केली. पण ज्वाळा भयानक होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी बसच्या खिडक्या तोडून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी लागलीच घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, या घटनेत 9 जण गंभीररित्या होरपळले होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चोवीसहून अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, अपघाताची सविस्तर चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.






