नऊ हजार बालकांना मिळाले नवजीवन

रुग्णालयातील नवजात बालक कक्षाला 10 वर्षे पूर्ण

| अलिबाग | प्रतिनिधी |

येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बालक कक्ष स्थापन करण्याला तब्बल 10 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने डॉक्टर, अधिकारी, परिचारीका आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आनंद साजरा केला. आतापर्यंत एसएनसीयू माध्यमातून 9358 नवजात बालकांना नवजीवन देण्यात आले आहे. तसेच, सुमारे 2000 कमी दिवसांची बालके बरी होऊन आपापल्या घरी गेली आहेत.

रुग्णालयाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत अत्याधुनिक नवजात बालकांसाठी नवीन कक्ष 17 नोव्हेंबर 2013 रोजी कार्यान्वित करण्यात आला होता. या ठिकाणी नवजात बालकांना गुणवत्तापुर्वक सेवा देण्याचे काम आजतागायत सुरु आहे. नवजात बालकांमध्ये होणारे आजार जसे कमी दिवसांच्या कालावधीत जन्माला आलेले बाळ, कावीळ, जन्मतःश्वासघेण्यास त्रास होणे, मातेच्या पोटात शी गिळणे, जन्मतः वंग असणे, आकडी येणे अशा विविध स्वरूपाच्या आजारांवर उपचार केले जातात. येथे दर आठवड्याला नवजात बालकांची आरओपी (डोळ्यांची) तपासणी, कानाची बेरा व ओएई तपासणी करण्यात येते, तसेच रक्तदोष आढल्यास योग्य उपचार देण्यात येतात. पुढील संभाव्य धोके टाळण्यास मदत होते. जन्मजात व्यंग याचे देखील निदान करून डीईआयसीमार्फत पुढील सेवा व उपचार केले जातात. आजपर्यंत याचा फायदा अनेक नवजात बालकांना झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली आहे. या ठिकाणी सर्व तालुक्यामधून नवजात बालके उपचाराकरिता येथे येत असतात.

श्रीवर्धन, माणगाव, कर्जत, रोहा, महाड या ठिकाणी नव्याने नवजात बालक कक्ष स्थापन करण्याकरीता शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पैकी महाडसाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सागर खेदु, अधिसेविका अनिता भोपी यांच्या मार्गदर्शना खाली या कक्षाचे कामकाज सुरु आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील, डॉ. प्रितम वर्सोलकर, परिसेविका, बालरोग तज्ञ परिचारिका, अधिपरिचारिका, स्वच्छता सेवक, सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने उत्तम कामगिरीने 10 वर्षाचा कालखंड पुर्ण केला आहे.
Exit mobile version