ग्रँडमास्टर झियात्दिनोवचा केला पराभव
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतामध्ये बुद्धिबळ खेळाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या अनेक वर्षात युवा भारतीय खेळाडूंनी जगात डंका वाजवला आहे. आता दिल्लीतील 9 वर्षीय बुद्धिबळपटू आरीत कपिल याने मोठा पराक्रम केला आहे. त्याने चक्क एका ग्रँडमास्टरला पराभूत केले आहे. त्यामुळे तो ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला आहे.
आरीतने केआयआयटी आंतरराष्ट्रीय ओपन टूर्नामेंटमध्ये त्याने रविवारी (दि.8) अमेरिकेच्या ग्रँडमास्टर रुसेट झियात्दिनोव यांना 9 व्या आणि अखेरच्या फेरीत पराभूत केले आहे. आरीतने जेव्हा रुसेट झियात्दिनोव यांना पराभूत केले, तेव्हा त्याचे वय 9 वर्षे 2 महिने आणि 18 दिवस इतके होते. त्यामुळे तो ग्रँडमास्टरला पराभूत करणारा भारताचा सर्वात युवा, तर जगातील तिसर्या क्रमांकाचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. ग्रँडमास्टरला सर्वात कमी वयात पराभूत करण्याचा विश्वविक्रम भारतीय वंशाच्या सिंगापूरमधील अश्वथ कौशिकच्या नावावर आहे. त्याने यावर्षाच्या सुरुवातीलाच 8 वर्षे 2 महिने वय असताना पोलंडचा ग्रँडमास्टर जेसेक स्टुपा याला पराभूत कले होते. दुसर्या क्रमांकावर सर्बियाचा लिओनीद इवानोविक आहे. त्याने 8 वर्षे 11 महिने वय असताना ग्रँडमास्टरला पराभूत केलं होते.
दरम्यान, 66 वर्षीय झियात्दिनोव यांनी आरीतविरुद्ध अनुभव वापरत खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण आरीतने पांढर्या मोहर्यांसह संयमाने खेळ केला. शेवटी झियात्दिनोव यांना पराभव मान्य करावा लागला. त्यांच्यातील सामना 63 चालींचा झाला. गेल्या काही वर्षात भारताच्या युवा खेळाडूंनी बुद्धिबळात दाखवलेल्या पराक्रमांच्या यादीत आता आरीतचाही समावेश झाला आहे.