19 वर्षीय फिरकीपटूची कमाल

पोलार्डला केले ‌‘गोल्डन डक‌’वर बाद; ठरली टी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी

| त्रिनिनाद | वृत्तसंस्था |

कॅरेबियन प्रीमियर लीग 2026 मध्ये शनिवारी (दि.29) जमैका किंग्जमेनच्या एका 19 वर्षीय फिरकीपटूने अनुभवी कायरन पोलार्डला पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्याचबरोबर त्याने ट्रिनबागो नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात एक निर्धाव षटक टाकले आणि त्यात तीन बळी घेत सर्वांचे लक्ष वेधले.

सीपीएल 2026 आता रोमांचक वळणावर आला आहे. प्रत्येक सामन्यांमध्ये अनेक खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या जमैका किंग्जमेनच्या व्हिटेल लॉज याने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच सीपीएल हंगामात भन्नाट कामगिरी केली आहे. सीपीएलच्या 20 व्या सामन्यात जमैकाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ट्रिनबागोचे सलामीवीर कोलिन मुन्रो आणि सुनील नरेन यांनी अर्धशतकी खेळी संघाला उत्तम सुरूवात करून दिली होती. त्यामुळे ट्रिनबागोची स्थिती 13 षटकांत 120 धावांवर एक बळी अशी होती. आपल्या पहिल्या षटकात 16 धावा देणारा लॉज जेव्हा पुन्हा गोलंदाजीसाठी परतला तेव्हा त्याने कहर केला. लॉजने ट्रिनबागोच्या 14 व्या षटकात गडी बाद करण्याची रांग लावली. पहिले तर त्याने मुन्रोला (52) बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा आणि विरोधी संघांना धडकी भरवणाऱ्या बलाढ्य कायरन पोलार्डला गोल्डन डकवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर लॉज हॅट्ट्रीकवर होता; मात्र, पुढचा फलंदाज मॅथ्यू ट्रॉम्प थोडक्यात वाचला. मिळालेल्या संधीचा ट्रॉम्पला फायदा घेता आला नाही. तो त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. यावेळी लॉजने 14 व्या षटकात एकही धाव न देता तीन बळी घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे ट्रिनबागोची स्थिती 120 धावसंख्येवर 4 अशी झाली. ही त्याची टी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यानंतर निकोलस पूरनच्या नाबाद 60 धावांमुळे ट्रिनबागोने 20 षटकांत 6 गडी गमावत 180 धावा केल्या. जमैका लक्ष्याचा पाठलाग करण्यास आला असता त्यांनी 14.4 षटकांत 3 गडी गमावत 127 धावा केल्या होत्या. पावसामुळे हा सामना नंतर थांबवण्यात आला आणि जमैका डीएलएसच्या नियमानुसार 7 धावांनी जिंकला.

Exit mobile version