डावखरेंनी केला पदवीधरांचा भ्रमनिरास- निलकंठ दिवेकर


| पेण | प्रतिनिधी |

गेली 12 वर्ष कोकण पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व निरंजन डावखरे करत आहेत. मात्र ज्या पदवीधरांच्या मतांवर निवडून आले त्यांच्यासाठी आजपर्यंत काय केले? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तथा पेण पंचायत समितीचे सदस्य निलकंठ दिवेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

पुढे दिवेकर यांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षात निरंजन डावखरे यांनी फक्त खुर्चीचा उपभोग घ्यायचे काम केले. विधिमंडळातील जुनी भाषण आपण पाहिली तर एक वेळा ही निरंजन डावखरे हे पदवीधरांसाठी काहीही बोललेले आठवत नाहीत. पहिल्या वेळेला राष्ट्रवादी काँगे्रसमधून आमदार झाले. दुसर्‍या वेळेला आपली जागा धोक्यात आलेली दिसताच त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले आणि तेथून आमदार झाले. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी धडपड करणारे निरंजन डावखरे यांनी पदवीधरांची भ्रम निराशाच केली. आज तिसर्‍या वेळेलादेखील ते निवडणूक रिंगणात उतरून पदवीधरांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करीत आहेत. गेल्या 12 वर्षात पेण तालुक्यासाठी असे कोणते भरीव काम केले की, कोणती निधी वापरली याचे उत्तर देखील आमदार निरंजन डावखरे यांनी द्यावे. आता पुन्हा एकदा ते कर्तव्यपथ नावाचा कार्यअहवाल पोस्टाच्या सहाय्याने घरोघर पोहोचवत आहेत. ज्यांनी पदवीधरांसाठी काहीच केले नाही त्यांना आता मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. पेणसह रायगडच्या पदवीधरांवर जेव्हा-जेव्हा वेगवेगळया संकटांना सामोरे जावे लागले तेव्हा एकदाही निरंजन डावखरे पदवीधरांच्या मदतीला धावून आले नाहीत अथवा स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्‍नासाठी विधीमंडळात एक ब्र शब्द काढला नाही अशांना आपण निवडून द्यायचे का? असा सवाल युवा नेते निलकंठ दिवेकर यांनी केला.

Exit mobile version