पदवीधराची ‘सुवर्ण’ कामगिरी
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सोमवारी (दि.2) भारताच्या नितेश कुमारने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हे भारताचे पॅरिस पॅरालिम्पिकमधील नववे पदक असून दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी नेमबाज अवनी लेखराने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.
नितेशचा सुवर्णपदकासाठीचा अंतिम सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलविरुद्ध झाला. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात नितेशने 1 तास 20 मिनिटाच्या लढतीनंतर 21-14, 18-21, 23-21 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात पहिला गेम सुरुवातीला रोमांचक झाला होता. पण पहिल्या गेमच्या मध्यानंतर नितेशने दमदार खेळ केला आणि हा गेम जिंकला. दुसर्या गेममध्येही पहिल्या गेमप्रमाणेच चित्र दिसले. नितेशने आघाडी घेतली होती. पण नंतर बेथेलने पुनरागमन करत बरोबरी साधली. त्याने दुसरा गेम जिंकला आणि सामना तिसर्या आणि निर्णायक सेटपर्यंत नेला. तिसरा गेम अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही खेळाडू हार मानण्यास तयार नव्हते. एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते 21-21 अशी बरोबरीही झालेली. पण अखेरीस दोन गुण जिंकत नितेशने सुवर्णपदकावर नाव कोरले.
आयआयटी मंदीमधून शिक्षण
29 वर्षीय नितेशने आयआयटी मंदीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. नितेश याचा 2009 मध्ये अपघात झाला होता, ज्यामुळे त्याचा पायाला दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीमुळे कायमस्वरुपी पायात अपंगत्व आले होते. पण यानंतरही नितेशने त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि त्याने 2013 मध्ये आयआयटी मंदी येथे प्रवेश मिळवला. तिथे शिक्षण घेत असतानाच त्याच्यामध्ये बॅडमिंटनबद्दल रस निर्माण झाला. 2016 मध्ये त्याची पॅरा नॅशनल चॅम्पियनशीपसाठी हरियाणा संघात निवड झाली. 2017 मध्ये त्याने पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते. तसेच, आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतही त्याने 2018 आणि 2022 मध्ये दुहेरीत पदके जिंकली आहेत.
बॅडमिंटनमध्ये आणखी पदके मिळणार
बॅडमिंटनमध्ये सुहास यथिराज, मुरुगेसन थुलासिमाथी, सुकांत कदम, मनीषा रामदास, शिवन नित्य श्री सुमथी हे देखील सोमवारी रात्री पदकांसाठी सामने खेळणार होते. पुरुष एकेरीत 4 प्रकारात यथिराज सुवर्णपदकासाठी, तर सुकांत कांस्यपदकासाठी खेळणार आहेत. तसेच, महिलांच्या एकेरी 5 प्रकारात थुलासिमाथी सुवर्णपदकासाठी आणि मनीषा कांस्यपदकासाठी खेळणार आहेत. शिवन नित्य श्री सुमथी महिलांच्या एकेरी 6 प्रकारात कांस्य पदकाचा सामना खेळणार आहेत. यामुळे भारताला बॅडमिंटनध्ये आणखी पदके मिळणार हे निश्चित आहे.