। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय जनता पक्षाच्या नव्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या समितीमध्ये महाराष्ट्रातील एकही नेता नाही. या समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या नावाचा समावेश या समितीत करण्यात आलेला नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर भाजपनं संसदीय समितीची घोषणा केली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना स्थान देण्यात आलेलं नाही. हे दोन्ही वरिष्ठ नेते आधी या समितीमध्ये होते. मात्र आता त्यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यांच्या जागी आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
या नेत्यांसोबत सुधा यादव, के. लक्ष्मण, सत्यनारायण जटिया आणि इक्बाल सिंह लालपुरा या नेत्यांना समितीत स्थान देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे समितीत कायम आहेत.
नव्या संसदीय समितीसोबतच भाजपनं केंद्रीय निवडणूक समितीचीदेखील घोषणा केली आहे. या समितीत एकूण 15 जण आहेत. या समितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांना या समितीत स्थान देण्यात आलेलं आहे. भाजपच्या निवडणूक समितीला तिकीट वाटपाचे अधिकार असतात. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीनं ही समिती महत्त्वाची मानली जाते.