| माथेरान | वार्ताहर |
गडचिरोली येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत माथेरानच्या निवेदिता रमेश साळुंखे हिने पुणे संघातून खेळताना नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तिच्या कामगिरीच्या जोरावर पुणे संघाने आतापर्यंत चंद्रपूर, अकोला व कल्याण डोंबिवली संघांचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता त्यांची गाठ रायगड संघासोबत होणार आहे.
माथेरानच्या सेंट झेवीयर्स शाळेत निवेदिताचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सध्या ती बी कॉमच्या दुसर्या वर्षात शिकत आहे. निवेदितला मॅरेथॉन शर्यत धावण्याची आवड आहे. मात्र, अकरावीत असताना तिला कोच पल्लवी सरडे यांनी बॉल बॅडमिंटन खेळण्यासाठी प्रोत्साहित केले.
गेल्या काही वर्षात बॉल बॅडमिंटन खेळ लोकप्रिय होऊ लागला आहे. या खेळात पाच खेळाडूंचा संघ असतो व 35 पॉईंट्सचा एक सेट असतो. तीन सेट खेळले जातात. यातील दोन सेट जिंकणारा संघ विजयी होतो. राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. निवेदिता या स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत असल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अपेक्षित आहे.