सुकेळी (गणपतवाडी) क्रिकेट स्पर्धेत निवी ठाकुरवाडी संघ विजेता

। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी (गणपतवाडी) यांच्या वतीने आयोजित भव्य आदिवासी समाजाच्या आयोजित क्रिकेट स्पर्धेत निवी ठाकुरवाडी संघ अंतिम विजेता ठरला, तर ढोकवाडी संघास उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये एकूण 36 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद निरगुडे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. दि.3 ते 9 जानेवारी अशा सात दिवसांच्या दरम्यान 8 षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेला परिसरातील क्रिकेट प्रेमींनी मनमुराद आनंद लुटला. या स्पर्धेमध्ये निवी ठाकुरवाडी या संघाने अंतिम विजेतेपद पटकावत रोख रक्कम 20 हजार एक रूपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ढोकवाडी संघास तेरा हजार एक रूपये व आकर्षक चषक, त्याचप्रमाणे तृतिय क्रमांक गणपतवाडी सुकेळी, चतुर्थ कासारवाडी, पाचवा क्रमांक वाडा, तर सहावा क्रमांक केळदवाडी संघास देण्यात आला. या बक्षिस वितरण समारंभाला ऐनघर ग्रामपंचायतीचे विनोद निरगुडे, माजी सरपंच गणपत निरगुडे, सदस्य प्रकाश डोबळे, सामाजिक कार्यकर्ते मालु शिद, कैलास पवार, राजेंद्र कोकले, जगन कोकले, यशवंत वारगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version