। उरण । वार्ताहर ।
जे.एन.पी.ए. बंदर परिसरातील करळ उड्डाण पूलावरील वळणावरुन विरोधी दिशेने जाणाऱ्या एन.एम.एम.टी. बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास घडला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करळ उड्डाण पूलावरील वळणावरुन विरोधी दिशेने जाणाऱ्या एन.एम.एम.टी. बस गाडीने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी सकाळच्या सुमारास घडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक पोलीस शाखेच्या पोलिसांनी सदर अपघात ग्रस्त दुचाकीस्वाराला जे.एन.पी.ए. टाऊनशिप रुग्णालयात दाखल करुन घेतले. परंतु दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने सदर अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला पुढील उपचारासाठी नवीमुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर दुचाकीस्वाराची ओळख पटली नसून उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वर्गाने त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याने सर्वस्तरातून पोलीसांवर कौतुकाची थाप पडत आहे.