एनएमएमटीने बसफेर्‍या वाढवाव्यात

उलवेकरांची मागणी

। पनवेल । वार्ताहर ।

मागील दोन ते तीन वर्षांपासून उलवेमध्ये झपाट्याने गृहनिर्माण विकास होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतर होत आहेत. मात्र, त्यांना दळणवळणाच्या सुविधा अद्याप सुस्थितीत उपलब्ध नाहीत. एनएमटीने बसच्या फेर्‍या वाढवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पनवेल, उलवेमध्ये झपाट्याने विकास होत असून महामुंबई म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी गृहनिर्माण विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरही उभे राहत आहे. अटल सेतू, शिवडी नाव्हा-शिवा लिंक, रेल्वे इत्यादी दळणवळणाच्या सुविधेने मुंबई, नवी मुंबई शहरे जवळ आली आहेत. तसेच बीकेसी सारखे संकुल ही या ठिकाणी प्रस्तावित आहे. त्यामुळे भविष्यातील विकास पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत आहे. उलवेला जाण्यासाठी रिक्षा, बस आणि रेल्वे यांची सुविधा आहे. परंतु बस आणि रेल्वेची फ्रिक्वेन्सी कमी आहे.

नेरूळ आणि बेलापूर वरून दर 40 ते 45 मिनिटांनी रेल्वे आहे. तसेच नेरूळ आणि बेलापूर होऊन एनएमएमटीच्या बस ही उपलब्ध आहेत. मात्र, 16 नंबर बस ही दर दोन तासांनी येते. त्यामुळे 16,17 आणि 23 नंबरच्या बसच्या फेर्‍या वाढवाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बस आणि रेल्वेमधून 20 ते 30 रुपयांनी प्रवास होतो, मात्र रिक्षाने गेल्यास जादा खर्चिक होते आणि वेळही वाया जातो. त्यामुळे या ठिकाणी एनएमएमटीने बसच्या फेर्‍या वाढवाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Exit mobile version