। पनवेल । वार्ताहर ।
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याच्या तहसिल कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने प्रशासकीय मंजूरी दिली आहे. याबाबत समाधानाची भावना जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.
कोरोना काळामध्ये पनवेल भागातील दौर्यामध्ये असतांना जिल्ह्याचा पालकमंत्री कु. तटकरे यांनी या इमारतीची अवस्था पाहिली. त्यानंतर सतत पाठपुरावा करून या इमारतीच्या उभारणीसाठी प्राधान्याने भूमिका घेतली. त्याचे फलित 11 लक्ष 3 हजार रुपयांच्या इमारत बांधकाम व अनुषंगिक कामांसाठी प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला.
मुंबई व रायगड जिल्ह्याच्या मध्यस्थानी असलेल्या पनवेल तालुक्यातून यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दळणवळणाच्या सुविधा आहेत. पनवेल तालुक्यातील औद्योगिक विकास यामुळे येथे लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील महसूल इमारतीचे बांधकाम होणे आवश्यक बाब आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, प्रशासकीय यंत्रणा बळकटीकरणासाठी नेहमीच सहकार्याची भूमिमा व प्राधान्य मिळत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले. या इमारतीच्या बांधकामासाठी महसूल विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेबाबत कार्यवाही व सहकार्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवर्जून आभार व्यक्त केले.