यशाला शॉर्टकट अन् मेहनतीला पर्याय नाही- चित्रलेखा पाटील

मी होणार स्वावलंबी उपक्रमाचे उद्घाटन
। अलिबाग । सायली पाटील ।
सध्याच्या काळात महिलांनी फक्त शिक्षण घेऊन आणि नोकरी करून उपयोग नाही तर, स्वतःची आवड आणि कला जोपासत व या दोन्हींचा मेळ साधत स्वतःला आर्थिकरित्या सक्षम बनविणे गरजेचे आहे. दांडगी इच्छाशक्ती आणि मेहनतीमुळे यशाचे शिखर गाठता येऊ शकते. मात्र मेहनतीला शॉर्टकट नाही. भरमसाठ महागाईमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोसळले आहे. येणारा काळ कठिण आहे. त्यामुळे महिलांनी सक्षम होणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात जे मेहतन घेतील तेच यशस्वी ठरतील, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले. पीएनपी शैक्षणिक संकुल येथे बुधवारी (दि.3) या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पीएनपी शैक्षणिक संकुलातील बास्केटबॉल कोर्टचेही उद्घाटन करण्यात आले.

प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना पीएनपी एज्यूकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, आरसीएफ थळचे मुख्य महाव्यवस्थापक अनिरुद्ध खाडीलकर, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे व अन्य.

यावेळी आरसीएफ थळचे मुख्य महाव्यवस्थापक अनिरुद्ध खाडीलकर, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, वरिष्ठ व्यवस्थापक (सीएसआर) प्रमोद देशमुख, चेंढरे ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, माजी सदस्य अजित माळी, पीएनपी एज्यूकेशन सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, पीएनपी कॉलेजचे प्रा.डॉ. ओंकार पोटे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, रिना म्हात्रे, अमित देशपांडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रशिक्षण केंद्राची पाहणी करताना मान्यवर.

आधुनिक काळात सर्वच महिलांनी प्रत्येक क्षेत्रातच उंच भरारी घेत सातत्याने यशाची उत्तुंग शिखरे पार केली आहेत. त्यामुळे स्त्रीयांसाठीचे नियम, अटी, बंधनांचे असलेले कुंपण भेदून आज ही स्त्रीशक्ती स्वतःचे असे एक वेगळंच अस्तित्व निर्माण करताना दिसून येते. महिलांचा बचाव करत त्यांना दुबळं बनवून नव्हे तर त्यांना आधार आणि पाठींबा देत उज्वल भविष्याच्या वाटचालीस मदत करत त्यांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने ङ्गमी होणार स्वावलंबीफ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पीएनपी शैक्षणिक संकूल येथील बास्केटबॉल कोर्टबाबत माहिती देताना चित्रलेखा पाटील.

प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या महिलांना मोफत शिवणयंत्र
महिला सक्षमीकरण तसेच महिलांची प्रगती होण्याकरिता कौशल्य विकास अंतर्गत टेलरिंग युनिट सुरू करून एका महिन्यात उद्योजिका बनविण्याचा मानस आहे. या प्रशिक्षणामध्ये 10 ते 12 आणि 12 ते 2 असे दोन वर्ग घेण्यात येणार असून आठवड्यातून 5 दिवस असे 10 जूनपर्यंत हे प्रशिक्षण असणार आहे. या प्रशिक्षणासाठी जयश्री साठ्ये आणि शिफा कादरी या दोन प्रशिक्षिका सहभागी महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या महिलांना शिवणयंत्र मोफत दिले जाणार आहे.

आरसीएफच्या सीएसआर फंडातून अर्थसहाय्य
महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे, तिच्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा, यासाठी तिच्या पंखात बळ भरण्याचे काम पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सुरु झाले आहे. या उपक्रमात पीएनपी शैक्षणिक संकुल, सीएफटीआय आणि आरसीएफ या तीन संस्थांचा मिळून हा उपक्रम राबविण्यात येत असून या प्रशिक्षणासाठीचे आर्थिक पाठबळ हे आरसीएफच्या सीएसआर फंडातून झाले आहे.

चित्रलेखा पाटील या कायमच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. परंतु या मी होणार स्वावलंबी उपक्रमात आरसीएफच्या सीएसआर फंडातून आर्थिक पाठबळ देताना आम्हाला आरसीएफचा एक भाग म्हणून फार आनंद वाटत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठीच्या एका उपक्रमाचा आम्हीही भाग बनलो आहोत. भविष्यात समाजाचे ॠण फेडण्याचा प्रयत्न चित्रलेखा पाटील यांनी सुचविलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत.

अनिरुद्ध खाडीलकर, मुख्य महाव्यवस्थापक, आरसीएफ थळ

Exit mobile version