| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा एमआयडीसी हद्दीत जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) प्रकल्प येणार असल्याने रसायनी-पाताळगंगा परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गावोगाव बैठका होऊन या प्रकल्पाला विरोध सुरू आहे. खालापूर, पनवेल तालुक्यासह रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रुप ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करुन सदर प्रकल्प रसायनीत होऊ नये यासाठी मंत्रीमहोदयांना निवेदन देत विरोध दर्शविला आहे.
गोवंडी येथील मे.एस.एम.एस. इन्होक्लिन प्रा.लि. हा प्रकल्प मुंबई उच्च न्यायालयाने हलविण्याचे आदेश देताच त्यासाठी खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे जागा निश्चित केली होती; परंतु जनसुनावणीदरम्यान तेथील नागरिकांनी विरोध दर्शविला. यानंतर बोरीवली पाताळगंगा ए-2 प्लॉट या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आला. अशा प्रकल्पामुळे आठ ते नऊ किलोमीटरचा परिसर बाधित होऊ शकतो. यामुळे रसायनी पाताळगंगा परिसरात वाढणाऱ्या औद्योगिकीकरणावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. हा प्रकल्प येऊ न देण्यासाठी परिसरात नागरिकांतून प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून रसायनी-पाताळगंगा पंचक्रोशितील सर्वच गावांतील नागरिक पेटून उठले आहेत. काही झाले तरी हा घातक प्रकल्प येऊ द्यायचा नाही, असे सर्वांनी मनाशी ठाम केले आहे. हा प्रकल्प पाताळगंगा एमआयडीसी हद्दीतील बोरिवली गावाच्या परिसरात होणार असला तरी त्याची झळ रसायनी पाताळगंगा व आसपासच्या परिसरातील सर्व गावांना बसणार आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या जैववैद्यकीय कचऱ्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन कॅन्सर, टीबी, अस्थमा, न्युमोनिआ, त्वचा रोग आदी आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.