राज्यातील कॉर्बेव्हॅक्स लसीचे अनेक डोस वाया
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारताचे औषध महानियंत्रक यांच्या तज्ज्ञ समितीने बारा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींसह कोर्बेव्हॅक्स लसच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली असून, 12 ते 15 या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, यात आता कॉर्बेव्हॅक्स लसी घेण्यासाठी पुरेसे मुले समोर येत नसल्याने महाराष्ट्रात अनेक डोस वाया जात असल्याची बाब समोर आली आहे. लसीकरणासाठी 12-14 वयोगटातील मुले समोर येत नसल्याने, कॉर्बेव्हॅक्स लसीच्या डोसच्या अपव्ययाचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. ही बाब राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीत दिसून आली. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, लसीकरणात हळूहळू वाढ झाल्याने लसींचा अपव्यय कमी होईल. साधारणत: 20 मुलांना लस देण्यासाठी कॉर्बेव्हॅक्सची 10 मिलीलीटरची कुपी (मात्रा) वापरली जाते आणि ही कुपी उघडली की चार तासांत ती वापरावी लागते. परंतु, 12-14 वयोगटातील मुलांचा या लसीकरणाकडे कल कमी असल्याने लसीकरण केंद्रांना पूर्ण कुपी वापरण्यासाठी पुरेशी मुले मिळत नाहीत. यामुळे डोस वाया जात आहे.
कोर्बेवॅक्स लसीबद्दल अनेकांमध्ये संकोचाची भावना आहे. कारण, ही एक नवीन लस आहे. त्यामुळे या लसीला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पहिल्या आठवड्याच्या तुलनेत आता थोडा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत 9 लाख बालकांचे लसीकरण
16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले. गेल्या दोन आठवड्यात राज्यात 9.5 लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर राज्यात या वयोगटातील सुमारे 40 लाख मुले आहेत.