| मुंबई | प्रतिनिधी |
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी नुकतेच संयुक्त निवेदन जारी करीत 31 डिसेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. त्यात स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
सण-उत्सव आणि विशेषतः वर्षाअखेरीस डिलिव्हरी कामगार हे ऑनलाइन अर्थव्यवस्थेचा कणा असतात; मात्र, प्रत्यक्षात त्यांना दीर्घ कामाचे तास, अपुरा मोबदला आणि असुरक्षित कामाची परिस्थिती यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा डिलिव्हरी करताना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, अपघाताचा धोका वाढतो, तसेच काही ठिकाणी ग्राहकांकडूनही असंवेदनशील वागणूक मिळते, असा आरोप संघटनांनी केला आहे. या संपात देशभरातील मेट्रो शहरांसह प्रमुख शहरांमधील गिग वर्कर्स सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला ऑनलाइन फूड डिलिव्हरी व ई-कॉमर्स सेवा विस्कळित होण्याची किंवा काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी वर्षाअखेरच्या नियोजनात याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.







