‘जमीन आमची, प्रकल्प आमचा; नोकरी मात्र उपऱ्यांना?’
। उरण । प्रतिनिधी ।
नवी मुंबई प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या; मात्र सिडकोच्या 50 सुरक्षा रक्षक व 4 पर्यवेक्षक अशा 54 पदांच्या भरतीत प्रकल्पबाधित भूमिपुत्रांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रायगड सुरक्षा मंडळाच्या सुमारे 200 उमेदवारांच्या यादीत उरण तालुक्यातील अथवा 95 प्रकल्पग्रस्त गावांतील एकाही भूमिपुत्राचे नाव नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभा राहिला, त्यांनाच साधी सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळणार नसेल तर भूमिपुत्रांच्या रोजगार धोरणाचे काय झाले? असा संतप्त सवाल 1984च्या आंदोलनातील जखमी प्रमोद ठाकूर यांनी केला आहे. सिडको, जेएनपीए, नवी मुंबई विमानतळ, द्रोणागिरी नोड किंवा अन्य आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षक भरती करताना प्रथम प्रकल्पबाधित, त्यानंतर गाव, तालुका आणि जिल्ह्यातील भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘जमीन आमची आणि नोकरी उपऱ्यांची’ हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. भूमिपुत्रांना डावलून भरती केल्यास तीव्र आंदोलन छेडू,’ असा इशारा प्रमोद ठाकूर यांनी दिला आहे.
