नो मोबाईल, नो टीव्ही..ओन्ली किल्ला

बच्चे कंपनीची किल्ले बनविण्याची लगबग

| खांब-रोहे | वार्ताहर |

दीपावली सुट्टी आणि दीपावली सुट्टीत किल्ले बनविणे यांचा परस्परसंबंध बच्चे कंपनींशी असल्र्याने सध्या दीपावली सुट्टीत विविध किल्ले बनविण्यात बच्चे कंपनी दंग झाले असल्याचे दिसत आहे. ‘नो मोबाईल, नो टीव्ही..ओन्ली किल्ला’ अशी आरोळी बच्चे कंपनीकडून दिली जात आहे.

छंद तसेच आवड म्हणून दीपावली सुट्टीत विविध किल्ले बनविण्याकडे बच्चे कंपनीचा कल दिसून येतो. यामध्ये मुलांबरोबर मुलीही आघाडीवर असतात. सध्याच्या तंत्रज्ञानाचे युगात सर्वांनाच सोशल मिडियाचे जबरदस्त आकर्षण असल्याने बच्चे कंपनीही बराचसा आपला वेळ हा मोबाईलवर गेम्स पाहण्यात तसेच टीव्हीवरील मनोरंजक कार्यक्रम पाहण्यासाठी खर्च करीत असतात. परंतू दीपावली ‘सुट्टीत नो मोबाईल, नो टीव्ही..ओन्ली किल्ला’ बनविणे, फटाके वाजविणे व जास्तीत जास्त मौजमजा करणे याकडे बच्चे कंपनीचा कल दिसून येतो.

दीपावली सुट्टी पडल्याबरोबर लगेचच हे लहानगे जीव सुट्टीत किल्ला बनविण्यासाठीचे नियोजन करून त्यादृष्टीने किल्ला बनविण्यासाठी दगड, माती, विटा, वाळू आणणे आदी कामांसाठी चिमुकले हात राबत असतात. आपण बनवित असलेला किल्ला अधिकाधिक चांगला व आकर्षक होण्यासाठी या चिमुकल्या जीवांची चाललेली धडपड ही अवर्णणीय असते. एकदा किल्ला बनवून झाला कि त्यामध्ये कल्पकतेने छोटेसे गाव वसविणे, शिवाजी महाराजांचे सिंहासन व त्यामध्ये बसलेले शिवाजी राजे, ठिकठिकाणी पहारा देणारे मावळे, प्राणी, तलाव, विहिरी, छोटी-छोटी झुडपे आदींसह अन्य बाबी या कल्पकतेने बसविल्या जातात. तर किल्ला साकार झाल्यावर त्याला योग्य रंगसंगतीने रंगवून किल्ला पुर्ण केला जातो.

दीपावली सुट्टीत वेळेचा सदुपयोग करून बच्चे कंपनीने बनविलेले किल्ले खरोखरच पाहण्यासारखे असतात. तर त्यांच्या या कलाकौशल्याचे सर्वत्र कौतूकही केले जाते.

Exit mobile version