गोगावलेंच्या दाव्यानंतरही अधिकृत घोषणा नाही
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा अनपेक्षित वळण मिळाले आहे. ‘मीच रायगडचा पालकमंत्री होणार’ असा आत्मविश्वास व्यक्त करणारे मंत्री भरत गोगावले यांचा दावा पुन्हा एकदा हवेतच विरला आहे. पालकमंत्रीपदाबाबत अधिकृत निर्णय होईल, अशी चर्चा असतानाही दिवसभरात कोणतीही घोषणा न झाल्याने ‘पालकमंत्री’चा फुगा फुटला आणि गोगावलेंची पुन्हा थट्टा झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांना केलेल्या मदतीच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून रायगडच्या पालकमंत्रीपदावरील दावा सोडला जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तिढा आता सुटणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
याच पार्श्वभूमीवर गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चेला आणखी हवा मिळाली. अधिकृत आदेश निघण्यापूर्वीच ‘मीच पालकमंत्री’ असा दावा केल्याने त्यांना नेमका कोणता हिरवा कंदील मिळाला? असा सवालही उपस्थित झाला. तटकरेंनी माघार घेतली का, महायुतीत काही राजकीय तडजोड झाली का, याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. गोगावलेंचे नाव पालकमंत्री म्हणून जाहीर झाले नाही आणि त्याबाबत कोणताही अधिकृत आदेशही समोर आला नाही. त्यामुळे गोगावलेंच्या दाव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुन्हा धक्का?
पालकमंत्रीपदाचा अधिकृत निर्णय होण्याआधीच नाव जाहीर करण्याच्या गोगावलेंच्या आत्मविश्वासाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकदा नव्हे, तर पुन्हा-पुन्हा त्यांचे दावे फोल ठरत असल्याने त्यांच्या राजकीय आत्मविश्वासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियापासून नाक्यानाक्यांपर्यंत त्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
