वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांचा निर्णय; पुढील आदेशापर्यंत निर्बंध राहणार कायम
| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा कॉलनी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खांदा कॉलनी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच आदईकडे जाणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर दररोज सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत ‘नो पार्किंग’ लागू करण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.
खांदा कॉलनी परिसरात लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, वाहनांसाठी पुरेशी अधिकृत पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. परिणामी, रस्त्यांची वाहतूक क्षमता कमी होऊन दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानक जवळ असल्याने या परिसरातून मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग रेल्वेने प्रवास करतो. सायंकाळी कार्यालये सुटण्याची आणि शाळा सुटण्याची वेळ एकाच वेळी येत असल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढते. त्यात शाळांच्या बस, व्हॅन आणि रिक्षांची भर पडल्याने खांदा कॉलनी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आदई पुलापर्यंत वाहतुकीचा वेग मंदावतो.
या समस्येवर उपाय म्हणून कळंबोली वाहतूक शाखेने संबंधित मार्गांवर सायंकाळी चार तास नो पार्किंग लागू करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. राहुल खाडे यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे खांदा कॉलनीतील सायंकाळची वाहतूक कोंडी कितपत कमी होते, याकडे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचे लक्ष लागले आहे. नो पार्किंग नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि पर्यायी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केल्यास परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना सूट
या निर्बंधातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना सूट देण्यात आली आहे.
