नो सेफ्टी, नो एन्ट्री; लाईफ जॅकेट नसल्याने जंजिरा किल्ल्यात प्रवेश नाही

बंदर अधिकार्‍यांच्या निर्णयाने काहीशी नाराजी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड हे पर्यटनाचे क्षेत्र असल्याने नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी बुधवारी (दि. 25) शेकडोंच्या संख्येने विविध जिल्ह्यांतून पर्यटक मुरुड राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दाखल झाले होते. परंतु, नुकत्याच मुंबईतील बोट दुर्घटनेमुळे स्थानिक प्रशासन अर्लट झाले असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जंजिरा किल्ल्यात प्रवाशांना सोडणार्‍या बोटींमध्ये सेफ्टी लाईफ जॅकेट नसल्याने बंदर अधिकार्‍यांनी पर्यटकांना बोटीत बसू दिले नाही. त्यामुळे पर्यटकांची नाराजी ओढावून घ्यावी लागली. तात्काळ एवढी जॅकेट उपलब्ध होऊ शकत नसल्याने बोट मालकांनाही जेवढी जॅकेट्स, तेवढ्याच पर्यटकांना परवानगी मिळाल्याचे दिसून आले.

दरम्यान, मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, पनवेल, नाशिक, वाई आदींसह राज्यभरातून पर्यटक गाड्या घेऊन सकाळच्या दरम्यान किल्ला पाहण्यासाठी आले होते. बोटीत लहान मुलांना नो एन्ट्री केल्याने पर्यटकांनी नाराजी दर्शवली. गेटवे ते एलिफंटा या ठिकाणी जाताना पर्यटकांच्या बोटीला नेव्हीच्या बोटीने जोरदार धडक दिल्याने बोट फुटून यामध्ये लहान मुलांसह 13 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असल्याने प्रशासन अर्लट झाले आहे. राज्य सरकारने अ‍ॅक्शन मोडवर येऊन प्रत्येक पॅसेंजर बोटीत संख्येपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नये तसेच प्रत्येक पॅसेंजरला सेफ्टी जॅकेट घातल्याशिवाय प्रवास करु देऊ नये, असा आदेश शासनाकडून काढण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राजपुरी येथील बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी या आदेशाचा पालन करत राजपुरी जेट्टीवरुन आज प्रत्येक बोटीत संख्येनुसार पर्यटकांना सेफ्टी जॅकेट घालून बोटीत प्रवेश दिला जात होता. ज्या बोटीत लहान मुलांना सेफ्टी जॅकेट नसतील, त्या बोटींना परवानगी नाकारल्याने तिकीट कार्यालयाजवळ गोंधळ उडाला आणि पर्यटकांनी नाराजी दर्शवली. काही पर्यटकांनी बंदर निरीक्षकांना घेराव घालून लहान मुलांना सोडण्यास विनंती केली. आमच्या जबाबदारीवर घेऊन जातो. परंतु, बंदर निरीक्षकांनी साफ नकार दिल्याने बंदर निरीक्षकांना पर्यटकांच्या रागाला सामोरे जावे लागले. यावेळी मुरुड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

दरम्यान, काही शालेय विद्यार्थ्यांना जेट्टीवर येऊन किल्लाचे फोटो काढून उदास चेहराने परतावे लागले. काही पर्यटकांनी मुरुड समुद्रकिनारी येऊन समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद तर कोणी उंटावरून, तर कोणी घोडा गाडीतून तर काहींनी बाईक फिरवण्याचा आनंद घेतला. पर्यटकांच्या आगमनाने शहरासह पंचक्रोशीतील लॉजिंग, हॉटेल, स्टॉलधारक, घरगुती खानावळ तेजीत असून, बर्‍याच महिन्यांनी व्यावसायिक सुखावला आहे.

बंदर निरीक्षक यांनी काल अचानक आदेश दिले की, प्रत्येक बोटीत संख्येनुसार सेफ्टी नवीन जॅकेट पाहिजेत, तरच तुम्हाला पर्यटकांना किल्ल्यात नेण्यास परवानगी दिली जाईल.ताबडतोब आमच्या काही बोटधारकांनी सेफ्टी जॅकेट आणले. पण, घाईघाईने लहान मुलांचे सेफ्टी जॅकेट आणण्यास विसरले. यामुळे लहान मुलांना किल्ला पाहण्यास बंदर निरीक्षकांनी परवानगी नाकारली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागत असल्याने त्यांनी नाराजी दर्शवली आहे.

शिडाचे बोटधारक

वरिष्ठांकडून आदेश असल्याने मी यामध्ये काहीही करू शकत नाही. संरक्षणासाठी सेफ्टी जॅकेट बोटीत असणं क्रमप्राप्त आहे. बोटधारकांनी याची सवय करायला पाहिजे.आज बोटीत सेफ्टी जॅकेट असते, तर लहान मुलांना किल्ला न बघता परतावे लागले नसते. तरी सर्व बोट धारकांनी नियमांचे पालन करावे.

सतीश देशमुख,
बंदर निरीक्षक, राजपुरी

Exit mobile version