व्यावसायिक सिलिंडवरील सबसिडी बंद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढत असून आता हा बोजा आणखी वाढणार आहे. देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे. यानंतर व्यावसायिक सिलिंडरवर मिळणारी 200 ते 300 रुपयांची सवलत आता बंद झाली आहे. त्यामुळे हे सिलिंडर कमी किमतीत मिळणार नाहीत.

व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणार्‍या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडि तीन सरकारी तेल कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना ही सवलत बंद करण्यास सांगितले आहे. हा निर्णय 8 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आला असून यासंदर्भात आदेशही आले आहेत.

इंडियन ऑइलने 19 किलो आणि 47.5 किलोचे सिलिंडर असलेले सिलिंडर ग्राहक आणि वितरकाला कोणत्याही सवलतीशिवाय विकले जावेत असा आदेशही जारी केला आहे. आयओसीच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी काढलेल्या पत्रातून हे स्पष्ट झाले आहे.

यामागचे कारण असे सांगितले जात आहे की, सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरवर सवलत देताना घरगुती एलपीजी सिलिंडरवरील तोटा भरून काढण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यामुळे किंमतींच्या दरात असमानता दिसून येत होती. ती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे वितरकांना सवलत म्हणून जी रक्कम दिली जात होती ती आता कमी होणार असल्याने तेलाच्या किमतीवरही त्याचा परिणाम दिसून येईल. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या किमती कमी झाल्यामुळे ते स्वस्त होऊ शकतात.

Exit mobile version