| पनवेल | प्रतिनिधी |
पावसाळा सुरू असूनही पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचे संकट कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तळोजा, कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विविध भागांत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, “टँकर नको, नळाला पाणी हवं!” या घोषपत्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तळोजा येथील आनंदसागर आणि सुखसागर इमारतीतील रहिवाशांनी “पाणी द्या, अन्यथा सदनिका परत घ्या” अशी भूमिका घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नियमित नळजोडणीने पाणी मिळत नसल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचा संताप महिलांनी व्यक्त केला. इमारतीच्या नावात “सागर“ असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी मांडली. कामोठे परिसरातही पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास स्वातंत्र्यदिनापासून आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
यावेळी कळंबोलीतील नागरिकांनी सिडकोच्या पाणीपुरवठा कार्यालयात धडक देत पुरेसे पाणी कधी मिळणार, याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. पनवेल महापालिकेचे स्वतःचे धरण नसल्याने महापालिका क्षेत्र एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाणीकपात लागू केल्यानंतर खारघर, तळोजा आणि कळंबोलीतील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी मोरबे धरणातून पनवेलला कायमस्वरूपी पाणी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या प्रश्नाला राजकीय रंग चढला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खारघर दौऱ्यावर असताना पनवेलच्या विकासाचा आराखडा मांडला; मात्र, पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नावर भाष्य न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
टँकर नको, नळाला पाणी हवं! पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक
