। नवीन पनवेल । वार्ताहर ।
ऐन गणेशोत्सवात तळोजाकरांच्या तोंडचं पाणी पळालंय. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय. तर अनेक भागात पाणी टंचाईची स्थिती आहे. सिडकोकडे पत्र व्यवहार करून पाणी समस्या दूर होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तळोजा वसाहती आणि पाणी समस्या हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. येथील रहिवाश्यांनी पालिका, स्थानिक आमदार तसेच तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेवून निवेदन देवून समस्या कथन केल्या आहेत. आघाडीचे सरकार जाऊन युतीचे सरकार आले, मात्र पाणी समस्या जैसे थे आहे. विशेषतः तळोजा सेक्टर दोन मधील जवळपास तीस सोसायटीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे बाहेरून टँकर विकत घेवून गरजा पूर्ण कराव्या लागत आहे. सोसायटीचा देखभालसाठी जमा होणारा खर्च टँकरसाठी करावा लागत आहे.
या विषयी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता, सेक्टर दोन हा परिसर उंचीवर असल्यामुळे काही सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे सिडकोकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तळोजा सेक्टर दोन मधील पाणी समस्या तीन ते चार दिवसांत सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सेक्टर दोनसाठी स्वतंत्र बूस्टर बसवले जाणार आहे. तसेच पाणी पुरवठा व्हावे यासाठी तात्पुरता स्वरूपात 40 हजार लिटरची टाकी उभारली जाणार असल्याचे सांगण्यात आले.