| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात स्थानिक ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाही आणि ती कामे अडवून ठेवली जात असल्याने शासकीय अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, शासकीय अधिकार्यांकडून समाधान होणारे उत्तर नाही तर आत्मदहन करण्याचा निर्धार उपोषणकर्ते रमेश कदम यांनी जाहीर केला आहे.
पोलीस मित्र संघटनेच्या वतीने कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. पोलीस मित्र संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश कदम, आदिवासी समाजाचे कार्यकर्ते नामदेव आगिवले हे आंदोलनाला बसले आहेत. कर्जत तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कर्जत, तहसिलदार अधिकारी कार्यालय, सर्व मंडळ आधिकरी आणि तलाठी सजा, तसेच महावितरण कार्यालय, वनसंरक्षक अधिकारी कार्यालय, लघुपाटबंधारे रायगड जिल्हा परिषद विभाग कार्यालय, जलसंपदा पाटबंधारे उपविभाग अधिकारी कार्यालय कर्जत या सर्व शासकीय कार्यालयात तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्यांवर मार्ग काढला जात नाही. कर्जत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत येथील कार्यालयात विलंब माफीचा मंजूर करून घेण्यासाठी आदिवासी शेतकरी नामदेव बाळु आगिवले या आदिवासी शेतकर्याकडून एका एजंटने दाव्यामधील आर्थिक रकमेची मागणी केली. परंतु, ती आर्थिक रक्कम देणे शक्य नसल्याने त्या आदिवासी शेतकर्याचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करून दिला नाही. उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यामुळे गरीब आदिवासी शेतकर्याची फसवणूक झाली आहे. सखोल चौकशी करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी उपोषणकर्ते यांची मागणी आहे.
त्याचवेळी महावितरण कार्यालयाकडून तालुक्यातील सहा हजारांहून अधिक ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त असल्याच्या तक्रारी येऊनदेखील बदलण्यात आले नाहीत. विद्युत रोहित्रांची कामेदेखील अर्धवट आहेत. पाटबंधारे विभाग आजही निद्रावस्थेत आहे. तर, वाहत्या नदी आणि नाल्यांमध्ये अतिक्रमण होत असताना नागरिक करूनदेखील कारवाई केली जात नाही. अशा समस्या घेऊन पोलीस मित्र संघटनेकडून आंदोलन केले जात आहे.पोलीस मित्र संघटनेकडून या सर्व मागण्यांसाठी तीन दिवस ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर उपोषण आणि आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणकर्ते यांनी दिला आहे.







