सुधागडातील जनजीवन विस्कळीत

पाली-खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प; नव्या पुलाचा जोड रस्ता पाण्यात

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी (दि.5) वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील अंबा नदी पुलाच्या जोडरस्त्यावर दोन्ही बाजूला सखल भागात पाणी भरले. त्यामुळे वाकण आणि खोपोली बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. परिणामी प्रवासी आणि वाहनचालकांचे मोठे हाल झाले. सुदैवाने रविवारची सुट्टी असल्याने विद्यार्थी व चाकरमान्यांची मोठी गैरसोय टळली.

पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन्ही बाजूंना बॅरिगेट्स टाकून खबरदारी म्हणून वाहतूक थांबवली आहे. याशिवाय भेरव येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यामुळे तिथली वाहतूकही बंद होती. वाकण-पाली मार्गावर वाकण नाक्याजवळ रस्त्यावर पाणी आल्याने, तसेच आवंढे गावाजवळील साकव पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला होता. ढोकळेवाडी येथे रस्त्यावर झाड पडले होते; परंतु, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ते तातडीने बाजूला करण्यात आले. या पुराचा फटका शेतीलाही बसला असून, पुलाजवळील शेतात पाणी शिरल्याने शेतकरी तुषार ठोंबरे यांचे सौर पॅनल पाण्यात बुडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

पाली-खोपोली राज्य महामार्गावर वावे गावासमोरील नाला तुंबल्याने पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर आले होते. त्यामुळे दुचाकी घसरून व चारचाकी वाहने अडकून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती, अशी माहिती ग्रामस्थ केतन म्हसके यांनी दिली. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी प्रकाश पालरेचा यांना माहिती दिली. पालरेचा यांनी तातडीने टीमसह जेसीबी घेऊन घटनास्थळ गाठले व सफाई सुरू केली. या मोहिमेत निखिल शिंदे, निलेश सकपाळ, सीताराम म्हसके आणि उमेश म्हसके या ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नाल्यातील अडथळा दूर होऊन रस्त्यावरील पाणी ओसरले व संभाव्य धोका टळला. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या या सुसंवादाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पूल झाला पण फायदा शून्य
अंबा नदीवर पूर्वीचा अरुंद व उंचीने लहान असलेल्या पुलाच्या बाजूला नवीन उंच व रुंद पूल बांधण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, नवीन मोठा पूल होऊनही त्याच्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते सखल भागात असल्याने नदीचे पाणी आता या रस्त्यांवरून वाहत आहे. एमएसआरडीसी प्रशासनाने या दोन्ही बाजूला मोरी टाकणे किंवा रस्ता उंच करणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
Exit mobile version