| माणगाव | वार्ताहर |
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे पारचा नारा देत लोकसभा निवडणूक लढवली गेले. त्यांना संविधान बदलायचं होतं म्हणून त्यांनी चारशे पारचा नारा दिला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मतदान मिळालं नाही. लोकसभेला मतांची कडकी लागली. म्हणून त्यांनी निवडणुकीच्या तीन महिना अगोदर योजना बहीण लाडकी आणली. भाजप पक्षाने सर्व भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन सरकार बनवलं आहे. ते महायुती सरकार नसून, ते महाभ्रष्ट सरकार आहे. त्यामुळे भाजपच नाव बदलून भ्रष्टाचारी जनता पक्ष ठेवलं पाहिजे, असे प्रतिपादन सर्व जनहारा आंदोलन संस्थापक उल्का महाजन यांनी विळे येथे केले.
दि. 18 नोव्हेंबर रोजी विळे येथे पार पडलेल्या स्नेहल जगताप यांच्या प्रचार सभेला सर्व जनहारा आंदोलन संस्थापक उल्का महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उबाठा विभागीय नेते बाबूशेठ खानविलकर, द. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड, संदीप जाधव, चंद्रकांत पवार, चंद्रकांत सुर्वे, अनिल मोरे, तुकाराम सुतार, जिल्हा संघटक सुधीर सोनावणे, घनश्याम तटकरे, चंद्रकांत गायकवाड, किशोर साखले, महादेव सारदळ, महादेव ताम्हणकर, सौरभ देशपांडे, सूरज भोसले, सागर खानविलकर आदी मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी महाजन पुढे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये निवडणूक हा मोठा सण आहे. भाजपने संविधान बदलण्याचे खुलेआम बोलून दाखवले आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला लोकसभेत मोठा दणका दिला आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गाण्याची ओळख दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा अशी दाखवून द्यायची आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष साम, दाम, दंड, भेद वापरून फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत. महाराष्ट्राचा वापर महायुती एटीएम कार्ड सारखा करीत आहे. महाराष्ट्राला ताब्यात घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह अनेक प्रयत्न करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, ते वाचवायचे असेल तर महाविकास आघडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. संविधानाच्या विरोधात उभ्या टाकलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पायउतार केले पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान या मातीतल नाही. मनुस्मृती या मातीतील आहे, असे विरोधक म्हणत आहेत. संविधान वाचविणारे नक्षलवादी आहेत. आम्हाला आता उज्वल, समृद्ध, स्वाभिमानी, समतावादी, सुसंस्कृत, संतांचा सर्वांगीण महाराष्ट्र हवा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या नावासमोरील तीन नंबरचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी उल्का महाजन यांनी केले.