पालकमंत्रीपदासाठी आग्रही नाही- तटकरे

| मुंबई | प्रतिनिधी |

रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांनाच मिळावे, यासाठी आपण कदापि आग्रह धरलेला नाही, असे खा.सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. यामुळे शिंदे गटाचे आ.भरत गोगावले यांचा मंत्री होण्याचा तसेच रायगडचे पालकमंत्री बनवण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. अजित पवारांच्या सहभागाने राजकीय गणिते बदलली गेली. त्याचे पडसाद गेले आठवडाभर रायगडातही उमटत आहेत. पालकमंत्रीपदी पुन्हा अदिती तटकरेच येणार अशी अटकळ व्यक्त केली जात आहे.

त्यावरुन शिंदे गटाचे आ.भरत गोगावले, महेंद्र थोरवे यांनी जोरदार विरोध करीत पालकमंत्रीपद हे शिंदे गटाला आणि ते पण भरत गोगावले यांनाच मिळाले पाहिजे, असा आग्रह धरला. यावरुन राजकीय विवादही निर्माण झाला. अखेर खा.सुनील तटकरे यांनीच आम्ही पालकमंत्रीपदासाठी आग्रही नाही, असे जाहीर केल्याने आता गोगावले यांचा मार्ग निर्वेध झाला आहे. मात्र अद्याप त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. संभाव्य विस्तारात गोगावले यांचे नाव आहे. त्यात समावेश झाला तर पालकमंत्रीपद त्यांच्याकडे जाईल, अशी अटकळ आहे.

एकजुटीने काम करु
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. ज्यावेळी एकत्रितपणे काम करायचं ठरलेलं असतं त्यावेळी त्याबाबतची जाणीव मनात ठेऊन काम करणं गरजेचं असते, असे खा. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. मला वाटतं की, याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्तरावर घेतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर एकजुटीने काम करण्यासाठी बरोबर आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय झालेला तुमच्यासमोर येईल, असंही सुनील तटकरेंनी नमूद केलं.

Exit mobile version