अंनिस तर्फे ‘द’ दारुचा नव्हे, तर ‘द’ दुधाचा उपक्रम


| पाली/बेणसे | वार्ताहर |

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेली चला व्यसनाला बदनाम करूया ही व्यसन विरोधी मोहीम दरवर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 25 ते 31 डिसेंबर या दरम्यान राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत थर्टीफर्स्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रोहा शाखेने ‘द’ दारुचा नव्हे तर ‘द’ दुधाचा हा प्रबोधनात्मक उपक्रम रोहा एस. टी. स्थानकासमोर राबवला. नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. दुधाचे वाटप करून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. फरीद चिमावकर यांचे हस्ते रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद वायगणकर, रायगड अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांचे उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

दारूचे पॅक रिचवतच अनेक जण सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करतात. मात्र या व्यसनांपासून व दारूपासून लोकांनी प्रामुख्याने तरुणांना दूर रहावे आणि ना फटाका, ना गुटखा, ना बिअर हॅपी हॅपी न्यू इयर म्हणून नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. तसेच यावेळी व्यसनमुक्त नागरिक सुजित मेहतर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विजया चव्हाण, नागोठणे शाखा कार्याध्यक्ष मदने साहेब, सुनील सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. दिनेश शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत पाडसे, प्रमोद खांडेकर, नीरज म्हात्रे आदीने मेहनत घेतली.

Exit mobile version