। पनवेल । वार्ताहर ।
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम करणार्या 226 जणांना – पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. पालिकेच्या चारही प्रभागात करण्यात आलेल्या कारवाईत बांधकाम परवानगीप्रकरणी लागणारी कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांना नोटिसीला उत्तर न दिल्यास पुढील कारवाई करण्याचे संकेत महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.
पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याने ही अनधिकृत बांधकामे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या रडारवर आली आहेत. पालिकेच्या अ, ब, क आणि ड प्रभागातील अनधिकृत बांधकाम करणार्यांनी नोटीस प्राप्त होताच, 32 दिवसांच्या आत बांधकाम पाडून टाकावे अथवा नोटीसीला लेखी उत्तर देऊन योग्य कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक अनधिकृत बांधकाम प्रभाग ’अ’ मध्ये असल्याचे निदर्शनास येत असून तब्बल 163 बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये गोदाम आणि हॉटेल्स अधिक आहे. या अनधिकृत बांधकामांत मंदिर, विरंगुळा केंद्र, उद्यानांचाही समावेश आहे. तर विना परवानगी पेव्हर ब्लॉक बसवल्याबद्दल पनवेल पोलिस उपायुक्त कार्यालयालाही नोटीस बजावण्यात आली आहे.