| राजापूर | प्रतिनिधी |
राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा अजब कारभार समोर आला आहे. या बँकेकडून कर्ज न घेतलेल्या अनेक नागरिकांना कर्ज घेतल्याच्या तर काहींना जामीन राहिल्याच्या नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला असून 104 वर्षांचा इतिहास असलेल्या राजापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्याबाबत आता खातेदारांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज घेऊन थकीत असल्याबाबतच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत. काहींना जामीन असल्याबद्दल नोटीसा काढण्यात आल्या आहेत. अनेकांनी आपण कर्जच घेतले नाही. तर काहींनी आपण जामीन राहिलो नाही अशा तक्रारी सहाय्यक निंबधक कार्यालयात मांडल्या. सहाय्यक निंबधक कार्यालयात सुनावणीदरम्यान आलेले नागरिक संतापले. वातावरण तापल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर काही मंडळींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यापूर्वी तक्रारदारांनी 15 ऑगस्टला आंदोलन केले होते.







