प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून गंभीर दखल; अधिकारी वर्गानी केली घटनास्थळाची पाहणी
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा कोलाड रस्त्यालगत बुधवारी(दि.24) दुपारी कुंडलिका नदीपात्रात अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील रासायनिक टँकरमधील पाणी सोडल्याची घटना समोर आली होती. यानंतर आरआयए, एमआयडीसी. आणि कोलाड पोलीसांनी याची दखल घेत तातडीने संबंधित टँकरचा शोध घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गाने देखील याची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
अशोकनगर ते पालेखुर्द रस्त्या दरम्यान काल घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी राकेश आवटी, डॉ. गजानन खडकीकर यांसह कोलाड पोलीस कुथे हे तातडीने घटनास्थळी जाऊन दाखल झाले. रस्त्यालगत झाडाझूडपाना सफेद रंग असल्यामुळे ही घटना गंभीर असल्याचेही त्यांच्या प्रथमतः लक्षात आले. मात्र, नदीपात्रा लगतच्या झुडपातून आत जात असताना त्यांना सिमेंटच्या काँक्रीटसाठी लागणारे मटेरियल या आधी सुद्धा खाली टाकल्याचे निदर्शनास आले. त्याचाच अंदाज घेत त्यांनी नदीपात्रात सर्वत्र पाहिले असता त्यावेळी तेथे बांधकामासाठी लागणारा रेडीमेड मिक्स कॉक्रिट टँकरमधून रिकामे केले असल्याचे आढळून आले. मात्र असे करणेही बेकायदेशीर असून यापुढे असे कोणतेही कुंडलिका नदीचे प्रदूषण खपवून घेतले जाणार नसून याचा शोध घेत जो दोषी आढळून येईल त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकऱ्यांनी दिला. रोहा-कोलाड मार्गावरील अशोकनगर ते पालेखुर्द या दरम्यान बुधवारी भर दुपारी कुंडलिका नदी पत्रात एक टँकरखाली करण्यात आला. त्यावेळी त्याच्यातील काही माल हा रहदारीच्या रस्त्यावर सांडून सुदैवाने किरकोळ अपघाताची घटना घडली.
काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्या टँकर चालकाचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कोलाड पोलीस, एमआयडीसी धाटाव उपविभागीय अभियंता, आर.आय.एच्या अधिकाऱ्यांनी सर्व सीसीटीव्ही यंत्रणा तपासून त्या टँकरचा कसोशीने छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. झालेल्या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्रीय कार्यालया मिळाल्याने गुरुवारी अधिकाऱ्यांनी कोलाड पोलिसांसोबत घटना स्थळाची पाहणी केली. यावेळी तेथे सिमेंट कॉक्रीट सदृश्य माल आढळून आला. याच भागात अनेक वेळा अशा प्रकारचा माल टाकण्यात आला असल्याचेही दिसून आले.
अधिकाऱ्यांनी येथील सर्व मालाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेतले आहेत. बांधकामासाठी लागणारा रेडीमेड मिक्स कॉक्रिट टँकरमधून रिकामे केले असल्याचे याठिकाणी त्यांना आढळून आले. मात्र असे रस्त्यालगत नदीपात्रात टँकर रिकामे करणेही बेकायदेशीर असून यापुढे असे कोणतेही कुंडलिका नदीत प्रदूषण केलेले खपवून घेतले जाणार इशारा संबधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या घटनेमुळे रासायनिक कारखान्यातील टँकर बरोबर आता रोह्यातील आरएमसी सिमेंट काँक्रेट प्लांटवर चालणारे टँकरही चर्चेत आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र घडलेल्या या घटनेमुळे पुढील चौकशीत आरएमसी प्लांटमधून आलेला हा टँकर कुणाच्या मालकीचा आहे हे सुद्धा लवकरच पुढे येईल का? असा प्रश्न परिसरातील नागरिक वर्गाला पडला आहे.
रोहा तालुक्यातील सर्व आरएमसी प्लांट चालकांना याप्रकरणी नोटीसा बजावणार असून जर यापुढे कोणीही असे प्रदूषण करणारे कृत्य करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
राकेश आवटी
