। महाड । प्रतिनिधी ।
दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत असली तरी या प्रगतीचा फायदा नक्की कोणाला होतोय, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. यापूर्वी सहज होणार्या प्रसुतीसाठी आता सिजर करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. आणि नातेवाईकदेखील पैशांचा विचार न करता सीझरसाठी तयार होतात. यातच महाड शहरांमधील रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरात 50 टक्केहून अधिक सीझर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रसुतीकरता गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच डॉक्टरांकडून सीझर करणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते. यासाठी अनेक कारणे देऊन रुग्णाच्या नातेवाईकांना घाबरवले जाते. रुग्णांचे नातेवाईकदेखील पैशापेक्षा जीव प्यारा असा विचार करून तात्काळ तयार होतात. काही ठिकाणी 30 हजार तर काही ठिकाणी 60 हजारापेक्षा अधिक रक्कम उकळली जाते. याबाबत नुकत्याच झालेल्या एका तक्रारीनुसार महाड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी चौकशी करून महाड शहरातील खाजगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
महाडमध्ये झालेल्या एका तक्रारीनुसार माहिती घेण्यात आली असता येथील खासगी रुग्णालयांत जवळपास 50 टक्क्यांहून अधिक सीझरचे प्रमाण आहे. याबाबत या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांकडे रुग्णालयांचा खुलासा पाठवला असून कारवाई केली जाईल.
– डॉ. शंतनु डोईफोडे, अधीक्षक, महाड ग्रामीण रुग्णालय