शेतकरी कक्षाला अल्प प्रतिसाद
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
शेतकर्यांना चिंतामुक्त करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष चार वर्षापुर्वी सुरु करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात या कक्षाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. परंतु, या कक्षाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे या कक्षाच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत पोहचण्यास कृषी विभागाला अपयश आले आहे.
तालुक्यासह जिल्ह्यातील कृषी कार्यालयामध्ये शेतकरी येत असतात. त्यांना विविध योजनांची माहिती देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक खिडकी तत्वावर शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आले होते. संबंधित अधिकारी व विभागामार्फत शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबरोबरच त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे कक्ष सुरु करण्यात आले. या कक्षामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्थेसोबत पिण्याचे पाणी, शेतीविषयक पुस्तके, विविध योजनांची माहिती पुस्तके ठेवण्यात आली आहेत. शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे कक्ष फायदेशीर ठरेल, अशी आशा शेतकर्यांना होती. परंतु, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे कृषी विभागाचा कारभार चालत आहे.
रायगड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये कृषी उपसंचालक काळभोर होते. त्यांची बदली झाल्यावर हे पद रिक्त राहिले आहे. यामुळे गेल्या अडीच वर्षापासून शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाचा कारभार बिनभरोसे चालत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून कृषी अधीक्षक, कृषी उपसंचालक तसेच तंत्र अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने या कक्षामार्फत सेवा देताना कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे या कक्षाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकर्यांची फार मोठी निराशा
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 98 हजार हेक्टर भात पिकांचे क्षेत्र असून सुमारे 14 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. भात पिकांबरोबरच आंबा, काजू या फळपिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच, भाजीपाला लागवडीवरदेखील भर दिला जात आहे. या कक्षातून त्यांना न्याय मिळेल अशी आशा या शेतकर्यांना होती. परंतु, शेतकर्यांची फार मोठी निराशा झाल्याचे चित्र आहे.
शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षामार्फत शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आहे. तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी विभागामार्फत शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाते. शेती शाळा घेऊन त्याचा प्रचार व प्रसारदेखील केला जातो. परंतु, सध्या महत्वावी पदे रिक्त असून उपसंचालक व तंत्र अधिकारी यांची पदे भरण्यात आली आहेत.
– सुरेश बोर्हाडे, कृषी उपसंचालक