त्रुटींची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे आदेश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
प्रशासकीय, तांत्रिक तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेसंबंधित त्रुटी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला आढळून आल्या. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अलिबागमधील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयासह इतर जिल्ह्यातील महाविद्यालयाला नोटीस बजावण्यात आली. महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली.
अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यायाच्या इमारतीचे काम उसर येथे सुरु आहे. 52 एकर क्षेत्रामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधले जाणार आहे. या ठिकाणी रुग्णालय, वसतीगृह सुसज्ज असे कार्यालय असणार आहे. त्यामुळे सध्या वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार जिल्हा रुग्णालयाच्या जागेत सुरु आहे. याठिकाणी प्रशासकीय इमारत बांधण्यात आली असून, कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये विद्यार्थ्यांचे वसतीगृह आहे. गेल्या चार वर्षापासून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, काही विद्यार्थी शिक्षण घेऊन जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करीत आहेत. सध्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश सुरू आहे. प्रवेशाची दूसरी फेरी सुरु आहे. लवकरच ही प्रक्रीया पुर्ण होणार असल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
मात्र, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजासह तांत्रिक शैक्षणिक गुणवत्तेबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला (एनएमसी) त्रुटी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. निकषांची पूर्तता न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. आयोगाच्या तपासणीत महाविद्यालयात अनेक मुख्य तांत्रिक, प्रशासकीय आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्या असून, त्यांचे दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. आयोगाने महाविद्यालयाला पुढील चार महिन्यांच्या आत या त्रुटींची पुर्तता करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
प्रवेश होण्यापूर्वी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत तपासणी केली जाते. भरतीसह तांत्रिक गुणवत्तेशी संबंधित त्रुटी काढण्यात आल्या. त्याची पुर्तता करण्यात आली आहे. भरती प्रक्रीया शासनाची आहे.
डॉ. पुर्वा पाटील
अधिष्ठाता
राज्यातील 30 महाविद्यालयांचा समावेश
राज्यातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळले आहे. यामुळे या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये गतवर्षी मान्यता मिळालेल्या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना, बुलढाणा आणि भंडारा या नऊ संस्थांसह सोलापूरमधील डॉ. वैशंपायन मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, सातारा, अलिबाग, जळगाव, मिरज, नंदुरबार, परभणी, सिंधुदुर्ग, नागपूरमधील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळमधील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरमधील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील आर्मड् फोर्स वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडमधी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई महानगरपालिकेचे शीव रुग्णालय यांचा समावेश आहे.
आयोगाचा निर्णय आणि पुढील कारवाई
2024-25 शैक्षणिक वर्षातही या त्रुटींद्वारे कित्येकदा सशर्त नवीकरण करण्यात आले होते. यंदा या त्रुटी कायम असल्याने, आयोगाने महाविद्यालयाला पुढील चार महिन्यांच्या आत या त्रुटी दुरुस्त करण्याचा आदेश दिला आहे. चार महिन्यांनंतर पुन्हा तपासणी करून गरज भासल्यास कडक कारवाई होणार आहे. महाविद्यालयाला या निर्णयाविरुद्ध 60 दिवसांच्या आत अपील करण्याचा अधिकार आहे.
