महसूल विभाग, ग्रामपंचायतकडून नोटीसा
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर जिते गावच्या हद्दीत असलेल्या हिल रॉक या रिसॉर्टमध्ये करण्यात आलेले बांधकाम हे जमीन बीनशेती परवाना न घेता करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने ही सर्व बांधकामे अनधिकृत ठरवली असून तेथे करण्यात आलेली आणखी काही बांधकामे यांना नोटीस बजावली आहे. तर महसूल विभागाची परवानगी नसताना व्यवसाय केले जात असल्याने महसूल प्रशासनाने नोटीस बजावली असून हिल रॉक हॉटेलवर संक्रांत आली आहे.
राज्यमार्ग रस्त्यालगत असलेल्या कोणत्याही जमीन यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रमधील जमीन असल्याने एमएनआरडीएचा न हरकत परवाना आवश्यक केला आहे. जिते गावच्या हद्दीमधील सर्व्हे नंबर ८२ मध्ये बांधकामे करण्यासाठी हिल रॉक हे हॉटेल उभे करणाऱ्या मालकाने नगररचना विभागाकडून परवानगी घेण्यासाठी अर्ज केला. मात्र त्यावेळी फक्त निवासी कारणासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र हिल रॉक हॉटेलमध्ये वाणिज्य वापर केला जात असल्याने आणि स्थानिक ग्रामपंचायतकडे बांधकामे करण्यासाठी देण्यात आलेले परवाने दिले नसल्याने ग्रामपंचायतकडून सर्व बांधकामे ही अनधिकृत यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तशा पद्धतीचे असेसमेंटवर नोंद असून जिते ग्रामपंचायतमध्ये आजही हिल रॉक हॉटेलमध्ये सर्व बांधकामांच्या नोंदी नाहीत. त्यामुळे त्या अनधिकृतपणे उभ्या केलेल्या बांधकामांकडून कर देखील संकलित करता येत नाहीत. कर संकलन व्हावे यासाठी जिते ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून अनेकवेळा नोटिसा देऊन कळविण्यात आले. मात्र हिल रॉक रिसॉर्टवाले जिते ग्रामपंचायत प्रशासनाला धाब्यावर बसवत आहेत. त्यांच्या नोटीसला कोणतेही उत्तर हिल रॉक व्यवस्थापन यांच्याकडून किंवा जमीन मालकांकडून दिले जात नाही.
माध्यमांनी हा प्रकार समोर आल्यावर जिते ग्रामपंचायत प्रशासनाने हिल रॉक रिसॉर्ट मालकाला नोटीस बजावली आहे. आपल्या सर्व मालमत्तांची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी या आठवड्यात हिल रॉकमध्ये जाणार असून त्या जमीन मालकाने सर्व कागदपत्रे सादर करावीत असे नोटीसमध्ये सूचित केले आहे. तर माध्यमांनी हिल रॉकमधील विहिरीसाठी केलेले खोदकाम, स्विमिंग पूलसाठी केलेले खोदकाम हे सर्व समोर आणल्यानंतर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी हिल रॉकमध्ये जाऊन आले. त्यांच्याकडून सविस्तर अहवाल तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आला असून तहसीलदार यांच्याकडून देखील नोटीस देऊन कागदपत्र सादर करण्यासाठी निश्चित तारीख देण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता
नगररचना विभागाचा निवासी वापर करण्याच्या परवाना असताना वाणिज्य वापर करून बक्कळ नफा कमविण्याचे काम या हॉटेल मालकाने मागील तीन वर्षात केले आहे. जमीन बिनशेती नसताना जमिनीमध्ये खोदकाम केले आहे आणि त्यामुळे हिल रॉक रिसॉर्ट आता सरकारी यंत्रणांच्या समोर आले असून येत्या काळात मोठी दंडात्मक कारवाई हिल रॉकवर होण्याची शक्यता आहे.






