नामचीन गुंड संजय कार्ले याच्या खुनाचा उलगडा; दोघे आरोपी गजाआड

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी काही अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह ऑडी गाडी ठेवून ते पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडले असून सदर हत्या ही सोन्याच्या देवाणघेवाणी वरून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत पुणे येथील व्यापारी व नामचीन गुंड संजय कार्ले यांची अज्ञातांनी हत्या करून त्याचा मृतदेह ऑडी गाडीमध्ये ठेवून पसार झाले होते. पुणे येथील इसमाचा पनवेल हद्दीत हत्या झाल्याने तालुक्यासह गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये हत्येच्या कारणासह आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल समोर होते.

या प्रकरणी शोध घेत असताना हत्या झालेली व्यक्तीचे नाव संजय कार्ले असून तो पुणे जिल्ह्यातील नामचिन गुंड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यावर बनावट सोन्याची नाणी विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून मोक्का लावण्यात आल्याचे पोलिसांना समजले. यांनतर पोलिसांनी महामार्गावरील हॉटेल, रिसॉर्ट व सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच गोपनीय माहितीवर व तांत्रिक तपासद्वारे सदर हत्या सराईत आरोपी असलेले मोहसीन मुलाणी (वय 37) आणि अंकित कांबळे (वय 29) यांनी केल्याचे समजले. या दोघांचा शोध घेत असता आरोपी हे नेपाळ येथे पळून गेल्याचे समजले. मात्र पोलीस या दोघांचा माग काढत होते.

अखेर सदर आरोपींपैकी एकजण देहूरोड पुणे येथे आल्याचे समजताच गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने झडप घालून मोहसीन मुलाणी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक पिस्तूल व तीन काडतुसे पोलिसांना आढळून आली. त्यांनतर पोलिसांनी अंकित कांबळे याला देखील ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या दोघांच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version