| मुंबई | वृत्तसंस्था |
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्यामधून मेट्रो धावणार आहे. या मार्गिकेवर पूर्वी 34 स्थानके प्रस्तावित होती. ही संख्या आता 50 पेक्षा अधिक होणार आहे. यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) सूत्रांनी दिली.
सुधारित प्रस्तावानुसार नायगाव ते अलिबागपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. यापूर्वी खारबाव ते अलिबाग दरम्यान मेट्रो प्रस्तावित होती. यादरम्यान 34 स्थानके होती. विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्गासाठी 2010 मध्ये 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, 13 वर्षांनंतर याच महामार्गिकेसाठी एमएसआरडीसी ‘हुडको’कडून कर्ज घेतले आहे. आता यासाठी 52 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या मार्गिकेच्या द्रुतगती मार्गाचे बांधकाम सुरुवातीच्या चार वर्षांत पूर्ण केल्यानंतर मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीचे आहे. भूसंपादनासाठी 18 हजार कोटी आणि बांधकामासाठी 20 हजार कोटी रुपयांहून अधिक तसेच इतर कामांसाठी 14 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावित मेट्रो ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईच्या मेट्रो मार्गिकेला जोडण्यात येणार आहे. प्रत्येक 3 ते 4 किलोमीटरवर मेट्रोचे स्थानक प्रस्तावित केले आहे. पनवेल तालुक्यामध्ये नांदगाव, करंजाडे, कोंडले आणि रिटघर या गावांच्यामध्ये या मेट्रोची स्थानके प्रस्तावित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बहुउद्देशीय मार्गिकेवर प्रत्येक 8 ते 9 किलोमीटरवर आंतरबदल असल्याने वाहनचालकांना इतर द्रुतगती महामार्गांप्रमाणे वळसा घालून प्रवास करण्याची गरज नाही. पनवेल तालुक्यातील बोर्ले सांगडे या गावाजवळ हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात असे आंतरबदल प्रस्तावित केले आहेत.