सिडको प्रशासनाची कार्यवाही
नागरिकांमध्ये समाधान
पनवेल | वार्ताहर |
सिडकोने नव्याने विकसित केलेल्या करंजाडे वसाहतीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत सिडको प्रशासनाकडे गेली अनेक वर्षे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर करंजाडेत सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासाठी पनवेल शहर पोलीस प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिक आभार मानत आहेत.
सद्यस्थितीत करंजाडे वसाहतीची लोकसंख्या साधारण 70 हजारांहून अधिक आहे. याठिकाणी स्थानिक नागरिकांसह मुंबई, ठाणे, कल्याण आदी शहरांसह कोकण व घाटमाथ्यावरून नोकरीधंद्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकांच्या, लहान मुलांच्या व विशेषतः महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून करंजाडे वसाहतीत सीसीटीव्ही बसवण्याची आवश्यकता होती. त्या दृष्टिकोनातून करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, पोलीस प्रशासन, करंजाडे फ्लॅट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर, प्रबुद्ध सामाजिक संस्था यासह अनेकांचा याबाबत सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच होता. अखेर सिडकोने वसाहतीत सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून करंजाडे वसाहतीतील महत्वाच्या ठिकाणी एकूण 11 सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
करंजाडे वसाहतीत सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून सिडको प्रशासन व वपोनि विजय कादबाने यांचे समस्त करंजाडे नागरिकांच्या वतीने आभार मानतो.
रामेश्वर आंग्रे (सरपंच- करंजाडे ग्रामपंचायत)
करंजाडे हद्दीत सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सीसीटीव्ही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
विजय कादबाने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)