पाच संघांना मिळणार संधी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अमेरिकेतील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ प्रथमच सहभागी होऊ शकतो. जंटलमन्स गेम अशी ओळख असणाऱ्या क्रिकेट या खेळाचा तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये समावेश होणार आहे. मात्र, त्यासाठी अजून 5 वर्षांच्या कालावधी आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला संघ टी-20 क्रिकेट स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी पात्र ठरतील.
क्रिकेटबद्दल जर बोलायचे झाले तर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला गेला आहे. 1900 मध्ये क्रिकेटला या खेळांच्या महाकुंभात स्थान मिळाले होते. आता 128 वर्षांनंतर ते पुन्हा ऑलिम्पिकमध्ये परत येऊ शकते. प्रसारण हक्कातून मिळणारे उत्पन्न हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. टी-20 फॉरमॅटच्या आधारे त्याचे आयोजन केले जाईल. मात्र, दोन्ही गटात केवळ 5-5 संघांनाच संधी दिली जाईल. अशा स्थितीत अनेक मोठ्या संघांना संधी मिळत नाही. आयसीसी क्रमवारीच्या आधारे संघ ठरवले जाऊ शकतात. यापूर्वी 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, तेव्हापासून ऑलिम्पिकमध्ये त्याच्या समावेश करण्याची चर्चा सुरु आहे.
नफ्यात दहा पट वाढ
पॅरिसमध्ये 2024 ऑलिम्पिकसाठी भारतातील प्रसारण हक्क सुमारे 165 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. 2028 आणि 2032च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्यास ब्रॉडकास्टरला हक्कातून सुमारे 1600 कोटी रुपये मिळू शकतात. म्हणजेच, 10 पट अधिक नफा वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.
नऊ खेळांची निवड
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटसह नऊ खेळांना 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी निवडण्यात आले आहे. क्रिकेटव्यतिरिक्त यात बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्सिंग, कराटे, किक बॉक्सिंग, स्क्वॅश आणि मोटरस्पोर्ट्सचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरीस क्रिकेटबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
ब्रिटनला पहिले सुवर्णपदक
1900 मध्ये बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड्स ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणार होते. पण बेल्जियम आणि नेदरलँड्सने माघार घेतली. यानंतर सुवर्ण आणि रौप्य पदकांचा निर्णय फक्त दोन संघांमधील सामन्याने झाला. पहिल्या डावात 117 धावा करून ब्रिटनचा संघ सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ 78 धावांवर गारद झाला. ब्रिटनने 5 बाद 145 धावा करून दुसरा डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात फ्रान्सचा संघ दुसऱ्या डावात केवळ 26 धावाच करू शकला. अशाप्रकारे हा सामना 158 धावांनी जिंकून ब्रिटनने ऑलिम्पिकमधील एकमेव सुवर्णपदक जिंकले आहे.