भयंकर! आता भीती ‘त्या’ 59 विषाणूंची


जगातील 59 प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणूंवर संशोधन; भविष्यातील महासाथीस कारणीभूत

बीजिंग/लंडन: चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेमधून करोना विषाणूचा फैलाव झाला असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे जगात आणखी एका गोष्टीमुळे चिंता व्यक्त होत आहे. जगभरातील 59 प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणू, जीवाणूंवर संशोधन सुरू आहे. यामध्ये वुहान प्रयोगशाळेचाही समावेश आहे. या प्रयोगशाळेतून भविष्यातील महासाथीस कारणीभूत ठरणार्‍या विषाणूंचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या वुहान येथील प्रयोगशाळेची चर्चा सुरू आहे. विषाणूंवर संशोधन करणार्‍या प्रयोगशाळेत जैव सुरक्षा स्तर 4 (बीएसएल 4) इतका असतो. या ठिकाणी संशोधक, शास्त्रज्ञ सुरक्षित वातावरणात जगातील सर्वात घातक असलेल्या विषाणूंवर संशोधन करू शकतील. विषाणूंमुळे गंभीर आजार फैलावण्याची भीती असते. त्यासाठी कोणतीही लस नाही. असे आजार फैलावू नये अथवा फैलावल्यास कोणती खबरदारी घेता यावी यासह इतर मुद्यांवर संशोधन सुरू असते. या खास प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञांना स्वतंत्रपणे ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या विशेष सूटची आवश्यकता असते.

बीएसएल-4 सुरक्षा स्तर असलेल्या प्रयोगशाळांचे मोठे केंद्र युरोप आहे. युरोपमध्ये 23 देशांमध्ये 25 प्रयोगशाळा आहेत. उत्तर अमेरिका आणि आशियामध्ये अनुक्रमे 14 आणि 13 प्रयोगशाळा आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये चार आणि आफ्रिकेत तीन प्रयोगशाळा आहेत. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी प्रमाणेच जगातील तीन चतुर्थांश प्रयोगशाळा या शहरांच्या जवळ आहे.

जवळपास 60 टक्के बीएसएल-4 प्रयोगशाळा सरकारद्वारे संचलित सार्वजनिक आरोग्य संस्था आहेत. तर, 20 टक्के विद्यापीठांद्वारे आणि 20 टक्के जैव-सुरक्षा संस्थांद्वारे चालवण्यात येतात. या प्रयोगशाळांचा वापर अत्याधिक घातक आणि संसर्गजन्य विषाणू आणि जीवाणूंमुळे निर्माण होणार्‍या आजारांच्या संशोधनासाठी केला जातो. त्या आजारांना मात देण्यासाठी लस आणि औषधांवरही संशोधन करण्यात येते.

वुहान इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी बीएसएल-4 प्रयोगशाळा आहे. सध्या अमेरिकेत कॅन्सस विद्यापीठात नॅशनल बायो अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो-डिफेन्स फॅसिलिटीचे काम पूर्ण झाल्यास ही प्रयोगशाळा मोठी प्रयोगशाळा ठरणार आहे. ही प्रयोगशाळा जवळपास 4000 चौमीटर क्षेत्रफळावर असणार आहे. त्याच्या तुलनेत बहुतांशी प्रयोगशाळा या लहान आहेत. माहिती उपलब्ध असलेल्या 44 प्रयोगशाळांपैकी निम्म्या प्रयोगशाळा या 200 चौमीटरपेक्षाही लहान आहेत.

सुरक्षेची मानके पूर्ण नाहीत?
या सर्व प्रयोगशाळा सुरक्षेची किती मानके पूर्ण करतात याबाबतही अनेक प्रश्‍न आहेत. अमेरिकेतील न्यूक्लिअर थ्रेट इनिशिएटिवनुसार, बीएसएल4 प्रयोगशाळा असलेल्या एक चतुर्थांश देशांनी जैव सुरक्षितेची काळजी घेतली आहे. अनेक देशांमध्ये सुरक्षितेसाठी आणखी सुधारणा करण्याची आवश्यक आहे.

Exit mobile version