माथेरानमध्ये आता पॉड हॉटेल

मध्य रेल्वेचा पुढाकार, पर्यटकांना मिळणार नवा अनुभव

| माथेरान | वार्ताहर |

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माथेरान हे राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे. या पर्यटनस्थळाला दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. येथे येणार्‍या पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने परवडणारे व किफायतशीर पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉड हॉटेलसाठी एका खासगी कंपनीशी मध्य रेल्वेमार्फत नुकताच करार करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल रेल्वेला मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नॉन फेअर रेव्हेन्यू योजनेंतर्गत स्थानकावर आणि रेल्वे परिसराबाहेर अनेक सुविधा सुरू केल्या आहे. या करारांतर्गत मुंबई सेंट्रल स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलिशान पाँड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्यात आले आहे. त्याला प्रवाशांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता मध्य रेल्वेने पर्यटकांचा सुविधेसाठी माथेरानमध्ये पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निविदा प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांच्या सोयीसाठी माथेरानमध्ये अत्याधुनिक पॉड हॉटेल सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.

पॉड हॉटेलबाबत कंत्राट ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहे. यशस्वी कंत्राटदाराने आठ लाख 19 हजारांच्या वार्षिक रकमेसाठी करार केला. कराराची पहिली तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर परवाना शुल्कात 10 टक्के वार्षिक वाढ करण्याच्या तरतुदीसह एकूण कराराचा कालावधी 10 वर्षांचा असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

माथेरान मधील 758.77 चौरस मीटर जागेवर हे पॉड हॉटेल उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरील उभारण्यात आलेल्या पॉड हॉटेलपेक्षा माथेरानचे हे हॉटेल तिप्पट असणार आहे. यामध्ये सुमारे शंभरपेक्षा जास्त पॉड उभारण्यात येणार असून, सिंगल, दुहेरी आणि फॅमिली पॉड अशी श्रेणीसाठी येथे उपलब्ध असणार आहेत.
Exit mobile version