किफायतशीर दरात पर्यटकांना राहता येणार
| रायगड | खास प्रतिनिधी |
माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. येणाऱ्या पर्यटकांना स्वस्त, दर्जेदार सुविधा देण्यासाठी आता मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पॉड हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. अतिशय किफायतशीर दरामध्ये पर्यटकांना माथेरानमध्ये मुक्काम करता येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील माथेरान हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बाराही महिने पर्यटकांचा राबता असतो. येथील सूर्योद आणि सूर्यास्त पाहण्याची अनेक पर्यटकांची इच्छा असते मात्र महागड्या निवास व्यवस्थेमुळे अनेक पर्यटकांना राहता येत नाही. त्यामुळे त्यांना हे मनोहरी दृष्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवता येत नाहीत. मध्य रेल्वे या ठिकाणी पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड प्रकल्प सुरु करणार असल्याने पर्यटांकाना दिलासा देणारे ठरणार आहे.
मुंबई सेंट्रल स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आलिशान पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्यात आले आहेत. त्याला प्रवाशांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने माथेरानमध्ये मोठा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधात नियोजनही झाले आहे. 25 सप्टेंबरला या पॉड प्रकल्पाच्या उभारणीसाठी ऑनलाइन निविदा काढण्यात येणार आहे. प्रस्तावित स्लीपिंग पॉड्स आणि पॉड हॉटेलमध्ये सर्व आवश्यक आणि आधुनिक सुविधा ठेवण्यात येणार आहेत. परवानाधारकांना माथेरानला स्लीपिंग पॉड, स्विस कॉटेज तंबू अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या तंबू खोल्या, घर किंवा कॉटेज विकसित करण्याची परवानगी आहे. रेल्वे स्थानकावरील स्लीपिंग पॉड्सचा विकास आणि संचालनाची जबाबदारी आणि त्यासाठीचा संपूर्ण खर्च परवानाधारकाद्वारे उचलला जाणार आहे.
पॉड हॉटेल म्हणजे? ज्या प्रवाशांना काही तासांसाठी एखाद्या स्टेशनवर थांबायचे आहे, मात्र हॉटेलची सुविधा परवडत नसेल किंवा उपलब्ध नसेल अशा प्रवाशांसाठी पॉड हॉटेल अतिशय उपयुक्त ठरतात. एका छोट्या कुपी किंवा कॅप्सूल प्रमाणे आपल्याला बसण्यासाठी, झोपण्यासाठी आणि आराम करण्यासाठी हे पॉड असतात.
असे असेल पॉड हॉटेल उत्तम वातानुकूलित निवास पॉड हॉटेलमध्ये मोबाइल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सुविधा, फायर अलार्म, इंटरकॉम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम आदी सुविधा आहेत. या पॉड्सचे बुकिंग फिजिकल मोड तसेच मोबाइल ॲपवर ऑनलाइन करण्याची व्यवस्था राहणार आहे.
सर्वात मोठे पॉड हॉटेल माथेरानमध्ये माथेरानमधील 758.77 चौरस मीटर जागेवर हे पॉड हॉटेल उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरील पॉड हॉटेलपेक्षा माथेरान मधील हा प्रकल्प तिप्पट मोठा असणार आहे. यामध्ये शंभर पेक्षा जास्त पॉड्स असतील. तसेच सिंगल पॉड्स, दुहेरी पॉड्स आणि फॅमिली पॉड्स अशा स्वरुपात हे पॉड हॉटेल असतील.